नवी दिल्ली वृत्तसंस्था । महात्मा गांधींच्या मारेकर्याचा गौरव करणार्या साध्वी प्रज्ञा यांना आपण माफ करणार नसल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्यांमुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरल्याचे दिसून येत आहे. त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मारेकर्याला देशभक्त संबोधल्यामुळे खळबळ उडाली आहे. भाजपने लागलीच या वक्तव्यावरून सावध भूमिका घेतल्यावर साध्वीने तातडीने माफी मागितली. तथापि, या माफीमुळेही भाजपवर होणारी टीका थांबण्यास तयार नाही. या पार्श्वभूमिवर, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साध्वींनी जाहीर माफी मागितली असली तरी आपण त्यांना माफ करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगून आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, गांधीजींबाबत जी विधानं बोलली जात आहेत ती वाईट, घृणास्पद आहेत. सभ्य भाषेत अशी वक्तव्यं केली जात नाहीत. असं बोलणार्याला १०० वेळा विचार करावा लागेल. त्यांनी माफी मागितली असेल तरी मी मनापासून त्यांना कधीही माफ करणार नाही. दरम्यान, पंतप्रधानांनी या प्रकरणी साध्वींची बाजू घेणार्या मंत्री अनंत हेगडे यांच्याबाबत एक शब्ददेखील काढला नाही हे विशेष.