Home क्राईम प्लॉट मोजणी व लेआउट घोटाळ्याची चौकशी व्हावी ; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

प्लॉट मोजणी व लेआउट घोटाळ्याची चौकशी व्हावी ; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहटार गावात प्लॉटिंग संदर्भातील गंभीर अनियमितता समोर आल्याचा आरोप करत एका प्लॉटधारकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. गट क्रमांक २५३ मधील अधिकृत नकाशानुसार ३४ प्लॉट असताना प्रत्यक्षात ४१ प्लॉट तयार झाल्याचा दावा करण्यात आला असून याबाबत चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.

लोहटार येथील रहिवासी शरद हरी धोबी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेल्या पत्रात नमूद केले आहे की, त्यांनी गट क्रमांक २५३ मधील प्लॉट क्रमांक ०५ हा १६ ऑगस्ट २०१८ रोजी रविंद्र दामू कुंभार यांच्याकडून खरेदी केला. या प्लॉटचे क्षेत्रफळ सुमारे १८८.३२ चौरस मीटर असून त्यानंतर ते नियमितपणे ग्रामपंचायत घरपट्टी व महसूल शेतसारा भरत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार हा संपूर्ण गट पूर्वी कै. नरहर भगवंत सोमपूरकर यांच्या मालकीचा होता आणि त्यांनी सदर जमीन बिनशेतीकडे वर्ग करून प्लॉटिंगसाठी परवानगी घेतली होती.

तक्रारदाराच्या माहितीनुसार सहाय्यक संचालक नगररचना विभागाने २८ फेब्रुवारी १९८५ रोजी मंजूर केलेल्या लेआउटनुसार गट क्रमांक २५३ मध्ये एकूण ३४ प्लॉट मंजूर आहेत. मात्र सध्या प्रत्यक्षात त्या ठिकाणी ४१ प्लॉट तयार झाल्याचे दिसत असून अतिरिक्त सात प्लॉट कसे तयार झाले याबाबत मोठा संशय निर्माण झाला आहे. या अतिरिक्त प्लॉटची विक्रीदेखील झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात नियमांचे उल्लंघन झाले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

तक्रारदाराने पत्रात असेही नमूद केले आहे की, नगररचना विभागाच्या मंजुरीतील अनेक अटी प्रत्यक्षात पाळण्यात आलेल्या नाहीत. लेआउटनुसार आवश्यक असलेले गटार बांधकाम, पाण्याची सोय तसेच अन्य मूलभूत सुविधा आजपर्यंत पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत. केवळ वीजपुरवठा देण्यात आला असून इतर पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्लॉटिंगमध्ये ज्या प्लॉटधारकांनी बांधकाम केले आहे त्यांनी ग्रामपंचायतीकडून बांधकाम परवानगी घेतली आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शरद धोबी यांचा मुलगा मुकेश धोबी यांनीही या संदर्भात माहिती घेतल्याचे पत्रात नमूद आहे. त्यांनी भरत नरहर सोमपूरकर यांच्याकडून मिळालेला लेआउट आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील लेआउट यामध्ये मोठा फरक असल्याचा दावा केला आहे. दोन्ही नकाशांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असल्याचे सांगत त्यांनी अधिकृत तपासणीची मागणी केली आहे.

तक्रारदाराने जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करत आपल्या प्लॉट क्रमांक ०५ ची अधिकृत मोजणी करून द्यावी आणि संपूर्ण प्लॉटिंगची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणामुळे पाचोरा तालुक्यातील लोहटार गावात खळबळ उडाली असून प्लॉटिंगमधील कथित अनियमिततेची चौकशी होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound