एरंडोल रतीलाल पाटील । उच्चशिक्षित असलेल्या नववधुने हळद लावण्यापुर्वी वृक्षारोपण करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
एरंडोल शहरातील देशपांडे गल्लीतील रहिवाशी व मोटर वाइंडिंगचा व्यवसाय करणारे किशोर पुंडलिक सोनार यांची उच्चशिक्षित कन्या ऐश्वर्या किशोर दहिवाळ (सोनार) हिचा विवाह मुक्ताईनगर येथील सुरेश राजाराम मुंडके यांचे उच्चशिक्षित सुपुत्र कपिल यांचे सोबत आज (दि.१७ मे) रोजी झाला. विवाहापुर्वी वधुला हळद लावण्यासाठी सर्व नातेवाईक व मित्र परिवार विवाह स्थळी उपस्थित झाले. त्याच वेळी ऐश्वर्या हिने हळदीपुर्वी आपल्याला वृक्षारोपण करावयाचे असल्याची इच्छा नातेवाईकांकडे व्यक्त केली. वधुचे पिता किशोर दहिवाळ (सोनार) यांच्यासह उपस्थित सर्व नातेवाईकांनी ऐश्वर्याच्या भुमिकेचे स्वागत करून तिला वृक्षारोपण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. यानंतर नववधु ऐश्वर्या हिने आपल्या नातेवाईकांसह वृक्षारोपणासाठी गांधीपुरा भागात नव्याने बांधण्यात येत असलेल्या श्री सदस्य बैठक हॉल परिसरात जाऊन वृक्षारोपण केले. तसेच सदरच्या वृक्षाचे संवर्धन करण्याची देखील ग्वाही दिली. तिच्या वतीने सोनार कुटुंब या वृक्षाचे संगोपन करणार आहे.
सद्यस्थितीत वृक्ष तोडीमुळे तापमानात मोठी वाढ होत असुन त्याचा परिणाम पर्जन्यमानावर होत आहे. तसेच प्रदूषणात देखील मोठी वाढ होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा प्रतिकुल परिणाम होत असल्यामुळे वृक्षारोपण करून या सामाजिक उपक्रमात आपण खारीच्या वाट्यानुसार सहभागी होत आहोत याचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया नववधु ऐश्वर्या हिने व्यक्ते केली आहे.
पहा : विवाहाआधी वृक्षारोपण करण्याच्या स्तुत्य प्रकल्पाचा व्हिडीओ.