फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यावर्षी तब्बल ४०० कडूलिंबाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यासाठी आणण्यात आले आहे. वढोडा परिसरातील शेताच्या बांधावर या सर्व वृक्षांची लागवड करण्यात येत आहे.
शासनाच्या ‘झाडे लावा, झाडे जगवा…’ या अभियानाला अनुसरून येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज स्व-खर्चाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करीत असून परिसरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वृक्षारोपण करून ती जगवत आहे. वृक्षारोपण करून जबाबदारी न झटकता त्यांचे संगोपन होत आहे की नाही हे ही ते पाहत असतात.
यावर्षी त्यांनी रोपवाटीकेतून तब्बल ४०० कडुलिंबाची मोठी रोपे विकत आणली. आणि ती शेताच्या बांधावर लावण्याचा संकल्प केला. तो आज पूर्णत्वास येत आहे. विशेष म्हणजे खड्डे खोदण्यापासून ते रोपण करणे पर्यंत स्व-खर्चाने मजूर लावून वढोडा परिसरातील शेताच्या बांधावर या सर्व वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. ज्या प्रमाणात वृक्षांची कत्तल सुरू आहे, त्या प्रमाणात वृक्षारोपणाचे कार्यक्रम कमी दिसून येतात याची महाराजांनी खंत व्यक्त केली. निसर्गाच्या भयावह बदलामुळे वारा, ऊन, पाऊस यांचे गणित बिघडले आहे. पर्यावरण समतोल राहण्यासाठी शेतकरी बांधवांनीही आपल्या शेताच्या आजूबाजूला मोकळ्या जागेवर, बांध्यावर वृक्ष लागवड करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.