सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सोलापूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी बाजी मारली आहे. भाजपच्या राम सातपुते यांचा त्यांनी पराभव केला. निवडणुकीनंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लान होता, असा आरोप त्यांनी केला आहे. मतदानाच्या दोन दिवस आधी या गोष्टी घडवण्याचा प्रयत्न झाला. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर कृतज्ञता मेळाव्यात बोलताना खासदार प्रणिती शिंदे हा खळबळजनक आरोप केला आहे.
जिल्ह्यात येऊन गावा-गावांमध्ये येऊन भांडणं आणि दंगल लावण्याचा प्रयत्न ते करणार होते. याचं उदाहरण तुमच्या समोर आहे. मतदानाच्या दिवशी पोलिंग बूथवर काय झालं होतं. पोलीस आयुक्तांनी सांगितलं होतं, बाहेर जा अन्यथा मला उमेदवारावर गुन्हा दाखल करावा लागेल, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटले. भाजपवाल्यांना कळलं होतं की निवडणूक आपल्या हातातून गेली आहे. आता एकच उपाय आहे ते म्हणजे दंगल लावा. तुम्ही त्यांची मतदानाच्या चार-पाच दिवस आधीची भाषणे बघा. लोकांमध्ये विभागणी करा आणि जिंका, असं त्यांना सांगण्या त आलं होतं, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.