जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अनेक ठिकाणी धार्मीक वाद विकोपाला जात असल्याचे दिसत असतांना पिंप्राळा परिसरातील बांधकामातून नवीन वाद उदभवण्याआधीच दोन्ही बाजूंच्या सामंजस्याने मिटल्याची दिलासादायक बाब घडली आहे.
पिंप्राळा परिसरातील श्रीराम समर्थ कॉलनीत एक जुनी इदगाह भिंत असून त्या ठिकाणी बांधकामाचे साहित्य उतरवल्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसात तक्रार केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवक तथा उपमहापौर कुलभूषण पाटील, मयूर कापसे व अमर जैन यांची भेट घेऊन अनधिकृत बांधकाम थांबवण्याची मागणी करून परिसराला भेट दिली होती. त्याचप्रमाणे रामानंद पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा पाटील यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, हिंदू आणि मुस्लिम पक्षाकडून विटा आणणार्या अज्ञात व्यक्तीचा सामूहिक निषेध करण्यात आला. या अनुषंगाने पिंप्राळा परिसरातील मुस्लिम ट्रस्ट व श्रीराम समर्थ मंडळात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न होऊन खालील प्रमाणे मुद्दे सर्व संमतीने मान्य करण्यात आले. यात प्रामुख्याने सदर ओपन स्पेसवर असलेली ईदगाह भिंत व पिंपळाच्या मंदिराचे पावित्र्य अबाधित ठेवून त्यावर अतिरिक्त कोणतेही बांधकाम केले जाणार नाही असे ठरविण्यात आले.
यासोबत, रमजान ईद व बकरी ईदला स्थानिक परिसरातील नागरिकांकडून सहकार्य केले जाईल. टेकडी धसु नये यासाठी सामूहिक प्रयत्न केले जातील त्याचप्रमाणे वृक्षारोपण केले जाईल याची ग्वाही देण्यात आली. तसेच अफवा पसरवून वातावरण कलुषित करणार्या व्यक्तीवर दोन्ही पक्षांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे परस्पर बांधकामाचे प्रयत्न करणार्या व्यक्तीवर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या परिसरातील हिंदू मुस्लिम एकता कायमस्वरूपी टिकविण्यासाठी दोन्ही पक्षांची अधून मधून बैठक घेण्यात येईल असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीत मुस्लिम ट्रस्टचे प्राध्यापक युनूस शेख, अब्दुल समी शेख सईद, रऊफ खान यांना श्रीराम समर्थ मित्र मंडळाकडून पवित्र रमजान निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. दोन्ही पक्षांच्या गळाभेटीनंतर संपूर्ण परिसरातील वातावरण आनंदमय झाले.
याप्रसंगी श्रीराम समर्थ मंडळाचे सचिव गोपाळ पाटील, अध्यक्ष अनिल पाटील, राहुल चौधरी, रामकृष्ण पाटील, पवन मेढे, तुषार चौधरी, अमृत पाटील, घनश्याम पाटील, चंद्रकांत चौधरी किशोर पाटील मंगल पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.