नागपूर प्रतिनिधी । हिवाळी अधिवेशनादरम्यान आज विधानभवनाच्या बाहेर सर्वपक्षीय आमदारांचे एकत्र फोटोसेशन झाले आहे. या फोटोसेशनबाबत विधानसभा सदस्यांना आधीच सूचना देण्यात आल्या असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या फोटोसेशन दांडी मारल्याने चर्चेला उधाण आले आहे.
या फोटोसेशनला भाजपचे महत्त्वाचे नेते अनुपस्थित होते. यामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार यासह फडणवीसांचे निकटवर्तीय नेते या फोटोसेशनला आले नाहीत. कदाचित झोपच उघडली नसेल, झोपेतून उठले नसतील म्हणून काही आमदार आले नाहीत, असे म्हणत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी फोटोसेशनसाठी अनुपस्थित आमदारांबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, भाजप आमदार आशिष शेलार हे फोटोसेशनसाठी आले होते, मात्र ते मधूनच निघून गेले. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री वेळेत आले नाहीत, असं म्हणत शेलार निघून गेले. दरम्यान सभागृहात काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत, आज फोटोसेशनला सर्वांसोबत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले असते तर बरं झाले असते, असे मत व्यक्त केले.