सर्व प्रकारच्या रोगांवर औषधाशिवाय कायमस्वरूपी उपचार – आचार्य सचिनजी

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शरीराला स्वच्छतेची गरज आहे, औषधीची नाही. मानव सोडून निसर्गातील सर्व जीव औषधाशिवाय स्वतःवर उपचार करतात. त्यामुळे इतर सजीवांमध्ये कोणताही कायमस्वरूपी रोग किंवा जुनाट आजार दिसून येत नाही. आज औषधावर अवलंबून असलेल्या प्रत्येक पाचव्या व्यक्तीला रोगांनी ग्रासले आहे. त्याचे कारण कृत्रिम जीवनशैली, कृत्रिम आहार आणि छोट्या छोट्या शारीरिक व्याधींवर ऍलोपॅथी औषधाचा उपचार घेणे आहे असे आचार्य सचिनजी यांनी सांगितले.

महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी स्थापन केलेल्या वढोदा येथील सतपंथ चारिटेबल ट्रस्ट निर्मित श्री निष्कलंक धाम तुलसी हेल्थ केअर सेंटर मध्ये आयोजित १८ जुलै ते २३ जुलै २०२३ दरम्यान प्राकृतिक चिकित्सा शिबिरात ते बोलत होते. आचार्य सचिनजींनी शरीर शुद्धिकरण नैसर्गिक चिकित्सा शिबिरात सांगितले की, निसर्गाच्या सान्निध्यात हे खान्देशातील पहिले भव्य दिव्य नैसर्गीक रुग्णालय आहे.

जिथे आल्हाददायक शुद्ध हवा, भव्य हिरवेगार लॉन, वेगवेगळी फुलझाडे, गौ शाळा, नयनरम्य कारंजे, यज्ञ शाळा, सुमधुर ध्वनी व्यवस्था, नैसर्गिक औषधी, निवासाची उत्तम व्यवस्था, अद्ययावत वातानुकूलीत रूमसह सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्याची प्रथम सुरुवात या भव्य शिबिराने झाली. या शिबिरात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान राज्यातून डॉक्टर, वकील, व्यावसायिक, प्राध्यापक, राजकीय पदाधिकारी, शेतकरी, पत्रकारांसह ३३ पुरुष व २० महिलांनी भाग घेतला आहे. या पाच दिवशीय शिबिरात सकाळ, दुपार व संध्याकाळच्या सत्रात वेगवेगळे उपचार केले जात असून आयुर्वेदिक काढा, वेगवेगळी फळं, सात्विक नाश्ता, भोजन आणि शारीरिक शास्त्र शुद्ध व्यायाम याद्वारे शरीरातील अंतर्गत घाण शरीराबाहेर काढली जात आहे. यात वायू चिकित्सा, पेय चिकित्सा, अग्निहोत्र चिकित्सा, नस्यचिकित्सा, जलचिकित्सा, योग चिकित्सा, कटी चिकित्सा, जलनेती चिकित्सा, वमन, शंख प्रक्षालन चिकित्सा, आहार चिकित्सा, योगनिद्रा चिकित्सा अशा प्रकारे जवळपास २२ प्रकारच्या चिकित्सा येथे करण्यात येणार आहे. पाच दिवसांमध्ये प्रत्येकाचे साधारण दोन ते पाच किलो वजन कमी होणार आहे. त्यामुळे ब्लड प्रेशर, डायबिटीस, थायराइड्स, ऍसिडिटी, गॅस, श्वासाचे विकार, दमा, अस्थमा, डोकेदुखी तणाव, चिंता आणि निद्रानाश हे रोग नाहीसे होणार आहेत.

या शिबिरात स्वतः महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी भाग घेतला असून त्यांनी सांगितले की, शरीराच्या उपचाराबरोबर मनाचा उपचार पण या ठिकाणी होत आहे. ध्यान, एकाग्रता, सकारात्मक विचार आणि संतांच्या वाणीचा लाभ या ठिकाणी सर्वांना होत असून मनाची शुद्धी, सत्संगाच्या माध्यमातून ज्ञानामृताचा लाभ सर्व शिबिरार्थीना मिळत असल्याने शिबिरार्थीकडून समाधान व्यक्त केले जात आहे. अशा शिबिराचे आयोजन दर महिन्याला होणार असून सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सतपंथ चारिटेबल ट्रस्टचे श्री प्रवीण भाई पटेल व ट्रष्टी यांनी केले आहे.

या शिबिराला आचार्य सचिनजीसह लीना दीदी, सुरेश निरालय व सहकारी, बाळू काका, प्रा. उमाकांत पाटील, अप्पा ड्रायव्हर, विलास भाऊ सपकाळे, सागर भाऊ सपकाळे, संग्राम सिसोदे, मनोज होले, अमोल होले, जितू भैय्या, हेमंत भारंबे, ऋषी चौधरी, विकास पाटील, खडका येथील महिला मंडळ आदींचे अनमोल सहकार्य लाभत आहे.

Protected Content