जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील रस्त्यांची दुर्दशा, चिखल, धुळ, गटारींच्या समस्या, बंद पडलेले पथदिवे यासह अनेक समस्या सोडविण्यासाठी आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी आज सोमवार ३० ऑगस्ट रोजी महापालिकेच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनआंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन महापौर जयश्री महाजन आणि आयुक्त सतिष कुळकर्णी यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरात गटारींच्या समस्या, रस्त्यांवरील खड्डे, शौचालयाचा प्रश्न, चिखल व धुळ यांसह मुलभूत सुविधा मिळत नसल्याचे ओरड जळगावकरांची अनेक दिवसांपासून आहे. आयुक्तांची महापालिकेत नियुक्ती झाल्यापासून आता त्यांना सेवानिवृत्तीचे वेध लागले आहे. आयुक्ताचे महापालिका प्रशासनावर परिणाम कारक नियंत्रण नसल्याचा हे प्रमाण आहे. पालिकेचे सत्ताधारी हे तर निष्क्रिय आहेच पण शासनाचे प्रतिनिधी म्हणून आयुक्तांचे काम आहे. सेवानिवृतेचे दिवस एक एक दिवस मोजल्या सारखे काम न करता घालवीत असल्याचे नागरीकांना जाणवते आहे. आतातरी आपल्या अधिकाराचा प्रामाणिक व निस्पृह पणे करून खालील अडचणी सोडवून शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा.
यात शहरातील रस्त्यांवरी खड्डे तातडीने भरावेत, कचऱ्याचे टेंडरचा प्रश्न मार्गी लावावा, महापालिकेतील कर्मचाऱ्याना शिस्त लावून कामांची जाबाबदारी द्या, शॉपींग कॉम्प्लेक्समध्ये नियमित स्वच्छतेचे नियोजन करा, स्वच्छता गृह सुरू करून त्यातील अवैध धंदे बंद करा. रस्त्यांवरील पथदिवे, रस्त्यांवरील गटारी, पालिकेचे स्वच्छता गृहाचा प्रश्न, हॉकर्सधारकांचे प्रश्न, गाळ्यांचा प्रश्न, भाजी मार्केट व धान्य मार्केट मध्ये वाहनावर शिस्त लावणे, शहरात सुरू असलेले अमृत योजना, भुयारी गटारी योजनांची कामे पुर्ण करावी यासह अनेक समस्या तातडीने सोडविण्यात यावे. आपल्याकडून कामे होत नसेल तर महापौर आणि आयुक्तांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले. दरम्यान, पावसाळ्यानंतर शहरात रस्त्यांची कामे सुरु होतील तोपर्यंत माती टाकुन रस्त्यावरील खड्डे बुजणार असे महापौर सह आयुक्तांनी आश्वासन दिले. यावेळी विभागीय अध्यक्षा कल्पनाताई पाटील, महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, शहर युवक अध्यक्ष स्वप्निल नेमाडे ,शहर सरचिटणीस अँड. कुणाल पवार रोहन सोनवणे अक्षय वंजारीसह कार्यकर्ते उपस्थित होते.