नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला आज संसदेत भाषण केले. यावेळी त्यांनी सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. माझ्या सरकारने नव्या भारताचे स्वप्न पाहिले आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देश अनिश्चिततेच्या परिस्थितीतून जात होता. परंतु माझ्या सरकारने सत्तेत आल्यानंतर नव्या भारताचा संकल्प केला आणि देशाला या अनिश्चिततेतून बाहेर काढले. भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचा सरकारने पण केला आहे. मोदी सरकारने नोटाबंदीचा महत्त्वाचा निर्णय घेतल्याने जनतेचा सरकारवरचा विश्वास वाढल्याचेही ते म्हणाले आहेत.
राष्टपती रामनाथ कोविंद संसदेला संबोधित करताना म्हणाले, सामान्य नागरिकाची पीडा समजून घेण्यासाठी माझ्या सरकारने विकासाला प्रथम प्राधान्य दिले आहे. प्रभु बासवन्ना म्हणाले होते, की करुणा सर्व धर्मांचा आधार आहे. सरकारने 9 कोटींपेक्षा अधिक शौचलयांचे बांधकाम केले. एका आकडेवारीनुसार, शौचालये बांधल्याने गरीबांचे आजारांपासून रक्षण होत आहे. महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीवर आम्ही देशाला हगंदारीमुक्त करण्याचा निर्णय घेतला. तसेच माझ्या सरकारने देशाचा अपार विश्वास जिंकला आहे. प्रत्येकाला सुख-शांती मिळेल हेच माझ्या सरकारचे लक्ष्य आहे. राष्ट्रपती पुढे म्हणाले की, माझे सरकार कुपोषण दूर करण्यासाठी काम करत आहे. लसिकरणासाठी इंद्रधनुष योजना सरकारने आणली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांसह आरोग्य केंद्र उघडले जात आहेत. नवीन एम्स रुग्णालये बनवले जात आहेत. गावात आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अतिरिक्त 31 हजार जागा जोडण्यात आल्या आहेत. मुद्रा योजनेतून जवळपास 73 टक्के कर्जाचं महिलांना वाटप करण्यात आले आहे. स्वातंत्र्यानंतर महिलांना सशक्त करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत. सरकारने स्टार्ट अप इंडियाच्या माध्यमातून तरुणांना स्वावलंबी बनवले आहे. सरकारने 7 IIT, 7IIMची स्थापना केली असून, स्कॉलरशिप आणि फेलोशिपच्या निधीच्या मर्यादेत 25 टक्क्यांची वृद्धी करण्याचा निर्णय घेतला आहे. 103 केंद्रीय विद्यालय, 62 नवे नवोदय विद्यालय उघडण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. स्वच्छ भारतअंतर्गत 9 कोटी शौचालयांची निर्मिती केली आहे. सरकारने 4 वर्षांत 1 कोटी 30 लाख घर तयार केली असून, देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. तसेच आतापर्यंत 21 कोटी जनतेला सुरक्षा विमा पुरविला आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत 6 कोटींहून जास्त गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले आहेत, रेरा कायद्यामुळे बिल्डर लॉबीला लगाम घातला, हे मुद्देही रामनाथ कोविंद यांनी अधोरेखित केले आहेत. दरम्यान,तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेला संबोधित करताना म्हटले, की या अधिवेशनात सार्थक चर्चा व्हायला हवी. आम्ही सर्वच मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी कटीबद्ध आहोत. अशा शब्दात त्यांनी विरोधकांना अर्थसंकल्पीय अधिवेशन शांततापूर्वक सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.