मुंबई (वृत्तसंस्था) जर बारामतीची जागा भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, अस धक्कदायक वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे शरद पवारांना बारामती गमावण्याची धास्ती वाटते का? अशा चर्चा सुरु झाली आहे.
‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणाले की, ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही, तेही बारामतीची जागा जिंकण्याचे धाडसाने सांगतात, त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने काही नियोजन केले आहे का? अशी शंका अनेकांच्या मनात येतेय. काही जणांनी ईव्हीएममधील चीपमध्ये छेडछाड होऊ शकते, अशी माहिती आपल्याला दिली. गुजरात, मध्य प्रदेशात अशा प्रकारच्या घटना घडल्याचे वाचनात आले. मात्र माझ्याकडे याबाबत खात्रीलायक माहिती नाही’ असे पवारांनी सांगितले. दुर्दैवाने निवडणूक आयोगाबद्दल सध्या येणाऱ्या बातम्या चांगल्या नाहीत. त्यामुळे असे काही घडले तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, अशी भीती व्यक्त करतानाच पवारांनी निवडणूक यंत्रणेवर लोकांचा विश्वास कायम राहायला हवा, असे मत व्यक्त केले आहे. दरम्यान, बारामतीमधून शरद पवारांची कन्या आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने रासप आमदार राहुल कुल यांची पत्नी कांचन कुल यांना तिकीट दिले होते.