Home प्रशासन मृत सैनिकाच्या आईला १० वर्षांनंतर पेन्शन पुन्हा सुरू; बीएसएफ जवान महेंद्र पाटील...

मृत सैनिकाच्या आईला १० वर्षांनंतर पेन्शन पुन्हा सुरू; बीएसएफ जवान महेंद्र पाटील यांच्या प्रयत्नांना यश 


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशसेवेत प्राण अर्पण केलेल्या सैनिकाच्या कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा अखेर यशस्वी ठरला आहे. सीमा सुरक्षा बलाच्या २४व्या बटालियनमध्ये कार्यरत असलेले स्वर्गीय सैनिक अनिल यशवंत मगर (पाटील) यांच्या आईला तब्बल दहा वर्षांनंतर थकित पेन्शनसह नियमित पेन्शन सुरू झाल्याने मानवतेचा विजय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

धुळे जिल्ह्यातील सांजोरी येथील रहिवासी स्वर्गीय सैनिक अनिल यशवंत मगर (पाटील) यांच्या निधनानंतर त्यांच्या आई श्रीमती आशाबाई यशवंत पाटील यांची पेन्शन डिसेंबर २०१५ पासून बंद झाली होती. याबाबत त्यांनी त्या काळात सीमा सुरक्षा बलाच्या उच्च मुख्यालयासह धुळे येथील माननीय न्यायालयात अर्जही केले होते. मात्र, आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने आणि मोलमजुरी करून लहान मुलासह उदरनिर्वाह करत असल्याने न्यायालयीन व कार्यालयीन खर्च परवडू न शकल्यामुळे त्यांची पेन्शनची लढाई मागे पडली.

वर्ष २०२३ मध्ये स्वर्गीय सैनिक अनिल पाटील यांच्यासोबत बटालियनमध्ये कार्यरत असलेले मुख्य आरक्षक प्रकाश पाटील यांनी ही विसरलेली बाब यावल तालुक्यातील विरावली येथील रहिवासी व सध्या सीमा सुरक्षा बलात सहायक उपनिरीक्षक/क्लर्क म्हणून कार्यरत असलेले महेंद्र पुंडलिक पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. यापूर्वीही महेंद्र पाटील यांनी चार वीरमातांना पेन्शन मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले असल्याने त्यांना या कामाचा मोठा अनुभव आहे.

माहिती मिळताच महेंद्र पाटील यांनी तत्काळ धुळे येथे जाऊन सर्व आवश्यक कागदपत्रे व पत्रव्यवहार गोळा केले आणि या वीरमातेला मदतीचा हात दिला. या प्रकरणात धुळे जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ वकील किरण कुमावत यांनीही तत्परतेने सहकार्य करत स्वखर्चाने नियमित विभागीय पत्रव्यवहार केला. याशिवाय महेंद्र पाटील यांनी दिल्ली येथील सैनिक पेन्शन कार्यालयात स्वतः जाऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. या कामात सांजोरी येथील रहिवासी व सध्या दिल्ली येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात कार्यरत असलेले जवान भानुदास पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

या सर्व प्रयत्नांचे फलित म्हणून स्वर्गीय सैनिक अनिल यशवंत मगर (पाटील) यांच्या आई श्रीमती आशाबाई यशवंत पाटील यांना आज संपूर्ण थकित रक्कम प्राप्त झाली असून, आता त्यांची नियमित पेन्शनही सुरू झाली आहे. ही रक्कम हातात पडताच आपल्या शहीद मुलाच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

दहा वर्षांनंतर न्याय मिळाल्याबद्दल श्रीमती आशाबाई पाटील यांनी धुळे येथील ज्येष्ठ वकील किरण कुमावत, मुख्य आरक्षक प्रकाश पाटील, दिल्ली येथील भानुदास पाटील तसेच सीमा सुरक्षा बलाचे सहायक उपनिरीक्षक महेंद्र पाटील यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. हा प्रसंग केवळ एका वीरमातेचा दिलासा नसून, शासकीय यंत्रणांमध्ये संवेदनशीलता आणि माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण ठरला आहे.


Protected Content

Play sound