जळगाव (प्रतिनिधी) शहरात गेल्या अनेक वर्षापासून एमआयडीसीत मोठे उद्योग आले नाही, पिंप्राळा रेल्वे गेट उड्डाण पूल आवश्यक असून जिल्हा रुग्णालयात एमआरआय सुविधा अत्यावश्यक आहे. शासनाने या सर्वांचा तातडीने विचार करून अधिवेशनात जळगाव शहरासाठी तरतूद करावी, अशी मागणी करणारे निवेदन आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी केले.
मुंबई येथे सोमवारी सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्याच दिवशी आ.सुरेश भोळे यांनी सभागृहात जळगाव शहरासाठी तरतूद करण्याची मागणी केली. आ.राजुमामा भोळे यांनी निवेदनात सांगितले की, जळगावातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा विषय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लागला. त्याचप्रमाणे पिंप्राळा रेल्वे गेटवरून उड्डाणपूल होणे गरजेचे असून तो शिवाजीनगर रस्त्याला जोडल्यास लाखो नागरिकांना फायदा होईल. जळगावातील हजारो विद्यार्थी उच्चशिक्षण घेतात परंतु नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्याने पुणे, मुंबई सारख्या शहराकडे धाव घेतात. त्यामुळे जळगाव एमआयडीसीत मोठे उद्योग आणावे, जेणेकरून रोजगार उपलब्ध होईल. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आरोग्य उच्चशिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सी.टी. स्कॅन मशीनची सोय उपलब्ध करून दिली आहे परंतु त्याठिकाणी एमआरआयची सुविधा नसल्याने रुग्णांना बाहेर हजारो रुपये खर्च करावे लागतात, तरी लवकरात लवकर एमआरआय मशीन उपलब्ध करून घ्यावे, अशी मागणी केली.
पोलीस हौसिंग सोसायटी, रस्त्यांकडे वेधले लक्ष
शहरातील पोलीस मुख्यालयाच्या आवारात पोलिसांसाठी भव्य हौसिंग सोसायटी उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यासंदर्भात आराखडा देखील तयार करण्यात आला परंतु पुढे निविदा काढण्यात आली नाही. त्यासाठी अधिवेशनात तरतूद केल्यास जिल्ह्यातील हजारो पोलिसांना त्याचा लाभ मिळणार आहे. तसेच जळगाव शहराला जोडणार्या असोदा रस्त्यासाठी ज्याप्रमाणे गेल्यावेळेस तरतूद केली तशी तरतूद शिरसोली, गिरणा पंपिंग, सावखेडा, आव्हाणे या रस्त्यांसाठी देखील करावी, अशी मागणी आ.राजुमामा भोळे यांनी अधिवेशनात मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
जळगाव शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी 100 कोटींचा विशेष निधी मंजूर केल्याने आ.सुरेश भोळे यांनी त्यांचे आभार मानले. तसेच शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी विशेष निधी दिल्याने त्यांचे देखील आ.भोळे यांनी आभार मानले.