Home Cities पाचोरा शांततेत विसर्जन, उत्साहात ईद जुलूस ; सण उत्सवासाठी पाचोरा प्रशासन सज्ज

शांततेत विसर्जन, उत्साहात ईद जुलूस ; सण उत्सवासाठी पाचोरा प्रशासन सज्ज

0
203


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा शहरात उद्या श्री गणेश विसर्जन व रविवारी ईद ए मिलाद साजरी होणार असल्याने पोलिस प्रशासन व नगरपालिका सज्ज झाले असून, नागरिकांना शांतता व स्वच्छतेचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असला, तरी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी चोख व्यवस्था उभी केली आहे.

श्री गणरायाचे दहा दिवस भावपूर्ण पूजन झाल्यानंतर उद्या त्याला निरोप देण्याची वेळ आली आहे. विसर्जन शांततेत व सुव्यवस्थीत पार पाडावे, यासाठी पाचोरा पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी शहरातील सर्व गणेश मंडळे व नागरिकांना संयम व शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे. विसर्जन मिरवणूक मार्गांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पाच अधिकारी, ४५ पोलीस अंमलदार, ५० होमगार्ड, १६ सदस्यांचा RCP प्लाटून, ५ रेल्वे पोलिस आणि जळगावहून आलेली स्ट्राइकिंग फोर्स तैनात करण्यात आली आहे.

या पोलिस बंदोबस्तासह रविवारी होणाऱ्या ईद ए मिलाद जुलूसासाठीही अशीच सुरक्षा व्यवस्था लागू राहणार आहे. पोलिसांनी दोन्ही समुदायांशी समन्वय साधत शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरण टिकवण्याचे नियोजन केले आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून, मिरवणूक मार्गांवर सीसीटीव्ही देखील कार्यरत असणार आहेत.

शहरातील नगरपालिका प्रशासनानेही विसर्जनासाठी जय्यत तयारी केली आहे. पाचोरा-जळगाव महामार्गावरील बिल्दी धरण परिसरात क्रेन, प्लॅटफॉर्म, फायर फायटर, फ्लडलाईट व निर्माल्य संकलन केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. जलतरणपटूंची नियुक्ती करून जलसुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी नागरिकांना आवाहन केले की, घरगुती गणपती आणि सार्वजनिक मंडळांचे निर्माल्य बिल्दी धरणावरील संकलन केंद्रावरच जमा करावे, जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखता येईल.

तसेच मोठ्या गणेश मंडळांचे निर्माल्य एकत्रित करून संकलन केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शहरात दुपारी २ वाजेनंतर विशेष ट्रॅक्टर फेरी काढण्यात येणार आहे. नगरपालिकेने शहरभर स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर राबवले असून, विसर्जनानंतर तातडीने स्वच्छता मोहीम राबवली जाईल.


Protected Content

Play sound