धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीणमध्ये नुकत्याच झालेला युतीच्या मेळाव्यात भाजपचे जेष्ठ नेते पी. सी. पाटील हे गैरहजर होते. शिवसेना उपनेते ना. गुलाबराव पाटील यांच्याशी असलेल्या टोकाचे मतभेदच त्यांच्या गैरहजेरी प्रमुख कारण सांगितले जात होते. एकप्रकारे पीसी पाटील यांनी ना. पाटील यांच्याविरुद्ध पुन्हा एकदा बंड पुकारल्याचे बोलले जात होते. परंतु आज धरणगावात निघालेल्या प्रचार रॅलीत पीसी पाटील सहभागी झाल्यामुळे ‘बंडोबा झाले थंडोबा…!’ अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे.
भाजप-शिवसेनेचे रावेर व जळगाव या दोन्ही मतदार संघात विधानसभानिहाय मेळावे सुरु आहेत. जळगाव ग्रामीण मतदार संघात देखील नुकताच युतीचा मेळावा झाला. परंतु या मेळाव्यात भाजपचे पी.सी.पाटील, नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे हे अनुपस्थित होते. या दोघांच्या गैरहजेरीचे नेमके कारण समोर आलेले नव्हते. परंतु आज पाटील व अत्तरदे हे दोघं प्रचार रॅलीत सहभागी झालेत. एवढेच नव्हे तर, ना.पाटील यांच्या मागे चालत त्यांनी मतदारांना मतदानाचे आवाहन देखील केले.
शिवसेना उपनेते ना.गुलाबराव पाटील व भाजपचे नेते पी.सी. पाटील यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. या दोघांमधील वादामुळे अनेकवेळा कार्यकर्ते एकमेकाला भिडलेले आहेत. तशात आता चंद्रशेखर अत्तरदे यांच्यामुळे तर शिवसेना-भाजपमधील टोकाला गेला आहे. अगदी अत्तरदे यांनी सोशल मीडियात टाकलेल्या पोस्टमुळे शिवसेनेने भाजपचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. दुसरीकडे पीसी पाटील यांना जिल्हा परिषदेत आपल्या पत्नीचा झालेला प्रभाव जिव्हारी लागलेला आहे. यावेळी वैशाली पाटील या निवडून आल्या असत्या तर, जिल्हा परिषद अध्यक्षपदावर त्यांचा प्रबळ दावा सर्वात मोठा राहिला असता. दुसरीकडे जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी नाथाभाऊंनी आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. पी.सी. पाटील हे नाथाभाऊंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.
भाजप पक्षश्रेष्ठीने धरणगावमधील मेळाव्यातील गैरहजर प्रकरण गंभीरतेने घेतल्याचे वृत्त आहे. मेळाव्यात गैरहजर राहिल्यामुळे उद्या पक्षाकडून आपल्याला विचारणा होऊ शकते, हा धोका लक्षात घेत पीसी पाटील व अत्तरदे यांनी आज गपचूप रॅलीला हजेरी लावल्याचे कळते. एकदंरीत पक्षाकडून विचारणा होण्याआधीच ‘बंडोबा थंडोबा’ झाल्याची चर्चा आहे. स्वतःच्या पक्षाचा उमेदवार असतांना देखील पीसी पाटील अशी भूमिका घेऊ शकतात, तर विधानसभेला मात्र, ते कोणाचे ऐकतील याची शक्यता कमी दिसतेय.