मुंबई (वृत्तसंस्था) नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी अटकेतील तिन्ही महिला डॉक्टर आरोपींची पोलीस कोठडी क्राईम ब्रांचला देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलाय. त्यामुळे तपास यंत्रणेला जेल कोठडीतच चौकशी करावी लागणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले की, शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी तीन दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आरोपींचा ताबा क्राईम ब्रांचकडे देण्यात येईल. तार आज (गुरूवारी) दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चौकशीसाठी ताबा दिला जाईल. या प्रकरणातील आरोपी हे पेशाने डॉक्टर आहेत, याचे भान ठेवा. सुरूवातीलाच या प्रकरणाचा तपास योग्य अधिकाऱ्यांकडे का दिला नाही? असा सवाल करत न्यायमूर्ती एस. शिंदे यांनी राज्य सरकारची ही मागणी फोटाळून लावली आहे. दरम्यान,सोमवारी मुंबई सत्र न्यायालयात डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. जातीय द्वेषातून मानसिक छळ केल्यामुळे डॉक्टर पायल तडवीने आत्महत्या केल्याचा तिघं महिला डॉक्टरांवर आरोप आहे.