पवारांच्या वक्तव्यांनी शिवसेनेच्या गोटात प्रचंड अस्वस्थता

udhdhav thakaray

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | सत्तास्थापनेबाबत भाजपला विचारा आणि सोनियांशी सत्ता स्थापण्याच्या मुद्यावर चर्चाच झालेली नाही, अशी बुचकळ्यात टाकणारी विधाने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केली. यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून अनेक नेते राष्ट्रवादीपेक्षा भाजपासोबत सरकार स्थापन करण्याचा विचार केला गेला पाहिजे, असे मत व्यक्त करत आहेत.

 

शिवसेनेच्या एका आमदाराने सांगितल्यानुसार, “शरद पवारांच्या वक्तव्याने आपल्याला धक्का बसला आहे. शिवसेनेने शरद पवारांसोबत जाण्याआधी दहा वेळा विचार केला पाहिजे, हे कोणत्या पद्धतीचे राजकारण आहे ? ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करणाऱ्या शिवसेनेसारख्या पक्षाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसपासून दूर राहिले पाहिजे, तसेच भाजपासोबत हातमिळवणी केली पाहिजे,” असे मत शिवसेना नेते व्यक्त करत आहेत.

गेल्या आठवड्यात सामायिक कार्यक्रम ठरवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकत्रित बैठक वांद्रे येथे पार पडली. बैठकीनंतर एकनाथ शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी सामायिक कार्यक्रम ठरला असून त्यावर अंतिम निर्णय आपल्या पक्षाचे प्रमुख घेतील असं सांगितलं होतं. त्यामुळे शरद पवार सोमवारी सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर सत्तास्थापनेवर बोलतील अशी अपेक्षा होती. पण शरद पवार यांनी सामायिक कार्यक्रमावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये कोणतीच चर्चा झाली नसल्याचं सांगितल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.

दक्षिण मुंबईतील एका कट्टर शिवसैनिकाने, पक्षाने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करायला नको, असे मत व्यक्त केले आहे, भाजपा नको असेल तर एकट्यानेच वाटचाल करावी, असेही म्हटले आहे. “भाजपा नको असेल तर शिवसेनेने एकट्याने आपल्या अजेंड्याला धक्का न लावता वाटचाल केली पाहिजे. समान विचारसरणी असणाऱ्या पक्षासोबत जाण्याची इच्छा नसेल तर एकट्यानेच लढावे,” असेही त्यांनी म्हटले आहे.

Protected Content