मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर फेरविचार करण्यास होकार दिला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांनी दबाव टाकला. याप्रसंगी अनेकांना भावना अनावर झाल्या. दरम्यान, मोठ्या प्रयत्नांनी अखेर शरद पवार हे सिल्व्हर ओकवर गेले. येथे पक्षाच्या मोठ्या नेत्यांशी त्यांची चर्चा केली. यानंतर अजित पवार, सुप्रीया सुळे आणि रोहित पवार यांच्याशी त्यांनी चर्चा केली. यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.
या संदर्भात अजित पवार म्हणाले की, पवार साहेबांनी आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी होकार दिला आहे. तथापि, यासाठी त्यांना दोन-तीन दिवस लागणार आहेत. यानंतर ते निर्णय घेतली. मात्र मुंबईतल्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता घरी जावे, त्यांना हवा तसाच निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे प्रतिपादन देखील अजित पवार यांनी या पत्रकार परिषदेत केले. तसेच कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यास आपण आपला निर्णय थांबविणार नसल्याचेही पवार साहेब म्हणाले अशी माहिती त्यांनी दिली.