मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज केंद्र व राज्य सरकारवर टिका करतांना आमदार एकनाथराव खडसे यांच्या जावयाबाबत गंभीर वक्तव्य करत चिंता व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुंबईत शिबिर आयोजीत करण्यात आले असून यात बोलतांना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, देशात सध्या सत्तेचा गैरवापर केला जातो आहे. मी ग्रामीण भागातही जातो तिथे पाहतो दोन मुलांमध्ये भांडण झालं तर पहिला दुसर्याला म्हणतो की गप्प बस नाही तर तुझ्या मागे ईडी लावेन. ईडी हा शब्द घराघरात माहित झाला आहे. सीबीआय हा शब्द घराघरांत माहित झाला आहे. कारण सत्तेचा गैरवापर होतो आहे.
आपले सहकारी अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांच्यावर खटला ठेवला गेला. १०० कोटींपेक्षा जास्त मोठा भ्रष्टाचार केला असा आरोप होता. १३ महिने त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं. मात्र चौकशीत काय बाहेर पडलं? सव्वा कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाला. तो देखील एका संस्थेच्या संदर्भात आला. नवाब मलिक यांनाही असंच तुरुंगात धाडण्यात आलं आहे. नवाब मलिक हे लोकांमधून निवडून आले आहेत. त्यांनी यांच्या गोष्टी लोकांसमोर आणल्या त्यामुळे त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं आहे. सत्तेचा गैरवापर यापेक्षा वेगळा काय असू शकतो ? असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला.
याप्रसंगी शरद पवार यांनी आमदार एकनाथराव खडसे यांच्या जावयाबाबत देखील वक्तव्य केले. ते म्हणाले की, आजच माझी जळगावमध्ये काही सहकार्यांशी चर्चा झाली. एकनाथ खडसे हे आपले सहकारी आहे. त्यांच्या जावयाला अटक करण्यात आली आहे त्यांच्या जावयाच्या केस दोन वर्षांपासून जास्त काळ त्यांना तुरुंगात ठेवलं आहे. त्यांची लवकर सुटका नाही झाली तर ते कोणतेही पाऊल उचलतील अशी चिंता शरद पवार यांनी व्यक्त केली. तर, ही सगळी उदाहरणं एकच गोष्ट सांगतात की आम्ही सत्तेचा गैरवापर करणार. आमच्या विरोधात जे मत मांडतील त्यांच्यावर कारवाई करणार असे टिकास्त्र त्यांनी सरकारवर सोडले.