मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे दाऊद इब्राहीम याच्याशी संबंध असल्याचा आरोप केल्यावरून राणे बंधूंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांवर निशाणा साधत त्यांचा संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडला होता. या संदर्भात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या तक्रारी नंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मुस्लिम तेढ निर्माण करून दंगल घडतील असं भाष्य केल्याची एफआयआर कॉपीत नोंद केली आहे.
याबाबत दाखल एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, नितेश राणे यांनी आझाद मैदानावर बोलताना नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाहीत अशी विचारण शरद पवारांना केली. वास्तविकरित्या राजीनामा घेण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि सरकारचा आहे. पण अनिल देशमुखांचा मराठा म्हणून राजीनामा घेतला पण नवाब मलिक मुस्लिम असल्याकारणाने त्यांचा राजीनामा घेतला नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं होतं. नितेश राणे हे हिंदू-मुस्लिम गटात तेढ, द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं तक्रारीत म्हटलं आहे.
तक्रारीत म्हटलं आहे की, निलेश राणे यांनी शरद पवार हे दाऊदचा माणूस आणि पाकिस्तानचा एजंट असल्याचं ट्वीट केलं होतं. निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, मला असा संशय येतो की पवारसाहेबच दाऊदचा माणूस आहे. खरोखर संशय येतो. ज्यानं दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला, बॉम्बब्लास्टच्या आरोपींशी व्यवहार केला. त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? अनिल देशमुखांचा पटकन राजीनामा घेतला, मग नवाब मलिक कोण आहे? कोण लागतो शरद पवारांचा? असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
नितेश राणे आणि निलेश राण हे जाणीवपूर्वक कट रचून समाजात प्रक्षोभक भाष्य करुन तेढ निर्माण करत दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने शरद पवारांचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडून अब्रुनुकसान करत आहेत. तसेच दाऊदशी संबंध जोडल्यानं शरद पवार यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असंही तक्रारीत म्हटलं आहे. या फिर्यादीनुसार निलेश आणि नितेश राणे यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.