चिनावलचे सुपुत्र पवन बढेंनी केली पाकची धुलाई ! ; आंतरराष्ट्रीय मंचावर तोंडघशी पाडले

सावदा, ता. रावेर जितेंद्र कुलकर्णी । येथून जवळच असलेल्या चिनावल येथील मूळचे रहिवासी तथा भारतीय विदेश सेवेत जिनेव्हा येथे कार्यरत असणारे पवन बढे यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत पाकिस्तानची जोरदार धुलाई करून त्या देशाचा दुटप्पीपणा उघड केला आहे.

मूळचे चिनावल येथील रहिवासी असणारे पवन बढे हे भारतीय विदेश सेवेत (आयएफएस) कार्यरत आहेत. ते सध्या स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा शहरात भारताच्या पर्मनंट मिशनमध्ये सचिवपदी कार्यरत आहेत. जिनेव्हा शहरात सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेत पाकिस्तान व तुर्कीसह काही इस्लामीक राष्ट्रांनी काश्मिरचा राग आळविल्यानंतर पवन बढे यांनी भारताची बाजू अतिशय सक्षमपणे मांडत त्यांच्यावर जोरदार शाब्दीक हल्ला चढविला. ते म्हणाले की, पाकिस्तान हा काश्मिरमधील स्थितीबाबत बोलत असला तरी खुद्द पाकिस्तानातील धार्मिक अल्पसंख्यांकांची स्थिती काय आहे हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. काश्मीरात लढा देण्यासाठी हजारो दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची पाकच्या पंतप्रधानांनी कबुली दिली आहे.

या परिषदेत बाहेरच्या लोकांमुळे काश्मीरमध्ये स्थानिक लोकांच्या हक्कांवर गदा येत असून त्यांची संख्या कमी झाल्याची आवई उठविण्यात आली. यावर पवन बढे म्हणाले की, पाकिस्तानात हिंदू, शिख आणि ख्रिस्ती अल्पसंख्यांक व त्यातही महिलांवर अनन्वीत अत्याचार होत आहेत. या समुदायांच्या मुलींचे अपहरण करून त्यांचे राजरोसपणे अपहरण केले जात आहे.

पाकने अनेकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर काश्मिर प्रश्‍नाचे तुणतुणे वाजवले असले तरी याचा काहीही उपयोग झालेला नाही. पाकचे विदेश मंत्री एस.एम. कुरेशी यांनी जिनेव्हाला भेट देऊन या प्रश्‍नाला खतपाणी घालण्याचा केलेला प्रयत्न देखील अयशस्वी ठरल्याचे पवन बढे म्हणाले.

याप्रसंगी पवन बढे यांनी पाकची तळी उचलणार्‍या तुर्कस्तानलाही चांगलेच फटकारले. आमच्या अंतर्गत प्रश्‍नांमध्ये बोलण्याचा आपल्याला काहीही अधिकार नसल्याचे त्यांनी सुनावले. तर इस्लामीक राष्ट्रांच्या संघटनेला (ओआयएसी) त्यांचा वापर पाकिस्तान हे राष्ट्र विकृत पध्दतीने वापरत असल्याची प्रखर टीका पवन बढे यांनी केली.

पवन तुळशीदास बढे हे २०१० सालच्या बॅचचे भारतीय विदेश सेवेतील (आयएफएस) अधिकारी आहेत. अनेक देशांमध्ये सेवा बजावल्यानंतर ते सध्या जिनेव्हात भारताचे अतिशय सक्षमतेने प्रतिनिधीत्व करत आहेत. मानवाधिकार परिषदेतील भाषणानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

Protected Content