जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील श्री नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळातर्फे आज, रविवार ३१ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता जळगावच्या राजाचे पाटपूजन व मंडप सोहळा महानगरपालिकेच्या इमारतीखाली उत्साहात पार पडला. यावेळी भाविकांच्या उत्साहात ढोल पथकाचे लक्षवेधी सादरीकरण झाले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नेहरू चौक मित्र मंडळतर्फे रविवारी जळगावचा राजा श्री गणपती यांच्या पाटपूजन व मंडप सोहळा आयोजित करण्यात आला होता. धीरज व रुचिता अग्रवाल या दामबत्याच्या हस्ते पाटपूजन पवित्र मंत्रघोषात पार पडले. पाटपूजन नंतर श्री गणपतीची महाआरती झाली.
प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जनता बँकेचे संचालक ललित चौधरी, ओंकारेश्वर मंदिर ट्रस्टचे दीपक जोशी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी नगरसेवक अमित भाटिया, डॉ. हेमचंद्र काळुंखे, श्री नेहरू चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी हे उपस्थित होते. महाआरती झाल्यानंतर आकर्षक असे शिवगंध संस्थेच्या ढोल पथकाचे सादरीकरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. प्रसंगी भाविकांनी ढोल ताशांच्या ठेक्यावर जल्लोष केला.
यावेळी नेहरू चौक रांगोळी व फुलांनी सुशोभित करण्यात आला होता. यावेळी महिला व पुरुष भाविकांनी पारंपारिक वेशभूषामध्ये उपस्थिती दिली होती. कार्यक्रमाचे आभार मंडळाचे कार्यकर्ते पियुष गांधी यांनी मानले. कार्यक्रमासाठी श्री नेहरू चौक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



