पत्नीने मद्यपान करावे, पतीचा आग्रह

madyaapan11111111

भोपाळ प्रतिनिधी । अनेक वेळा तुमच्या कानावर आले असेल पती दारू पितो, अशी अनेक महिलांची तक्रार असते. पतीच्या या व्यसनामुळे अनेक माहिलांनी घटस्फोट देखील घेतला आहे. मात्र, येथील एका कुंटूबात पत्नी मद्यपान करण्यास मनाई करते म्हणून, पतीने चक्क न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

याबाबत माहिती अशी की, घरात सर्वजण मद्यपान करतात. म्हणून आपल्या पत्नीनेही मद्यपान करावे, अशी विनंती मध्यप्रदेशातील एका पुरुषाने येथील कुटूंब न्यायालयात केली आहे. या दाम्पत्याच्या विवाहाला १० वर्षे झाली आहेत. त्यांना तीन मुले असून, सर्वात मोठे मूल ९ वर्षांचे आहे. अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातील हा पुरुष खासगी कंपनीत नोकरी करतो, पण आपल्या पत्नीने मद्यपान करावे, असा त्याचा आग्रह आहे. आपले वडील, आई, भाऊ, आत्या, मामा व तसेच चुलत भाऊ असे सारेच जण मद्यपान करतात, त्यामुळे पत्नीनेही मद्यपान करायला हवे, असे त्या पुरुषाचे म्हणणे आहे. यामुळे कायदेशीर सल्लागारही चकित झाले आहेत. दोघांचा विवाह झाल्यापासून पतीने तिला मद्यपानासाठी आग्रह चालवला होता. पण तिने सातत्याने नकारच दिला. आता मात्र प्रकरण हातघाईला आले आहे. तिने मद्यपान करावे, या आग्रहामुळे तिला त्रास व्हायला लागला आहे. या माहिलेच्या घरात कोणीच दारू पीत नाही. त्यामुळे मला ते आवडत नाही व मी माझ्या मुलांनीही कधी मद्यपान करु देणार नाही, असे या महिलेचे म्हणणे आहे. लग्न झाल्यावर जेव्हा ही कौटुंबिक समारंभात मद्यपान असायचे तेव्हा मी मुलांसह माहेरी जायची. मात्र आता माहेरी न जाण्याचा आणि नवऱ्याचा वा सासू-सासरे यांचा आग्रहही न मानण्याचा निर्णय घेतल्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. यामुळे सल्लागारही गोंधळले आहेत. एखाद्याचे मद्यपान सोडवण्यासाठी समजूत घालता येते वा काही उपचारांनी ते बंदही करता येते. पण मद्यपान करायला भाग कसे पाडायचे, हा प्रश्नच आहे. भोपाळ कुटुंब न्यायालयाचे सल्लागार शैल अवस्थी यांना ही या प्रकरणाचे काय करायचे, हे कळेनासे झाले आहे.

Protected Content