जळगाव (प्रतिनिधी)। ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरंच धन्य ऐकतो मराठी’ मराठी भाषेची अस्मिता जपत केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील व ए. टी. झांबरे विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प.वि.पाटील विद्यालयाच्या मुख्यापिका रेखा पाटील, ए.टी. झांबरे विद्यालयाचे मुख्यापक डी.व्ही.चौधरी यांच्याहस्ते आद्यकवी, लेखक, साहित्यिक महामानव कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
चिमुकल्यांकडून मायमराठीला अभिवादन
विद्यार्थ्यांनी मराठी कविता तसेच गाणी सादर करत आपल्या मायमराठीला अभिवादन केले व मराठी भाषेचे महात्म्य कथन केले. आदित्य दलाल याने कुसुमाग्रजांची कविता सादर केली तर ऋतुजा सोनवणे हिने कुसुमाग्रजांचे जीवनकार्य वर्णन केले. पूर्वा पाटील या विद्यार्थिनीने मराठी भाषेचे महत्व विशद केले. विद्यार्थ्यांची व्याकरणावर आधारित एक परीक्षा घेण्यात आली. प्रियंका वंजारी – प्रथम, जास्वंदी कुलकर्णी- द्वितीय, मयुरेश देशपांडे- तृतीय क्रमांक मिळवला.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा लोहार यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थीनी रेवती सोनवणे व पर्णीका पाटील यांनी केले तर आभार वर्षा राणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक योगेश भालेराव, योगेश सुने, आर.इन.तडवी, एकनाथ पचपांडे, सुचिता शिरसाठ, डी. बी.चौधरी, माधुरी भंगाळे, दीपाली चौधरी, स्वाती पाटील, सुधीर वाणी आदींनी परिश्रम घेतले.