
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील यावल एसटी आगाराची सध्या अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली असून बसेसची कमतरता, नादुरुस्त गाड्या आणि अपुरी कर्मचारी संख्या यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकेकाळी उत्पन्नाच्या बाबतीत नाशिक विभागात आघाडीवर असलेल्या या आगाराची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असल्याची तीव्र प्रतिक्रिया प्रवासी आणि स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

यावल आगारात मोठ्या प्रमाणावर एसटी बसेस नादुरुस्त अवस्थेत उभ्या असल्याने अनेक नियोजित फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असलेल्या नागरिकांची गैरसोय वाढत चालली आहे.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा बस उशिरा येणे किंवा फेऱ्या अचानक रद्द होणे ही बाब आता नेहमीची झाली आहे. काही बसेस जुनी आणि तांत्रिकदृष्ट्या कमकुवत असल्याने प्रवास करताना प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
प्रवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष जगदीश कवडीवाले यांनी या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांनी लोकप्रतिनिधींनी आणि संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन यावल आगारासाठी अधिकाधिक नवीन एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. तसेच आगारातील नादुरुस्त बसेस तातडीने दुरुस्त करून नियमित बससेवा सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावल आगार पूर्वी उत्पन्नाच्या बाबतीत नाशिक विभागात आघाडीवर होते, मात्र सध्या बसांची कमतरता आणि कर्मचारी अभावामुळे आगाराचे उत्पन्नही घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. योग्य नियोजन आणि पुरेशा बसेस उपलब्ध करून दिल्यास पुन्हा एकदा हे आगार पूर्वीप्रमाणे सक्षम होऊ शकते, असे मतही स्थानिकांनी व्यक्त केले आहे.



