मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्षात थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी अंधेरी मतदारसंघात निवडणूक होत आहे. यात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांचा राजीनामा आज सकाळी मंजूर करण्यात आला आहे. त्या आज अर्ज दाखल करत आहेत. तर भारतीय जनता पक्षातर्फे गेल्या निवडणुकीतील पराजीत उमेदवार मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.
मध्यंतरी एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना अंधेरीची जागा लढविणार असल्याची माहिती समोर आली होती. तथापि, भाजप ही जागा लढविणार असून मुरजी पटेल हे उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले आहे.