पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील जगमोहन नगर आणि वर्धमान नगरात चोरट्यांनी भर दिवसा चोरी करून लाखो रूपयांचा ऐवज लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, येथील जगमोहननगर आणि वर्धमान दोन घरे चोरट्यांनी भरदिवसा फोडली. जगमोहनदास नगरातील रहिवासी तथा जिल्हा बँक कर्मचारी रवींद्र पाटील हे कामावर तर त्यांच्या पत्नी सुनीता पाटील एन.ई.एस.हायस्कूलमध्ये कार्यरत असल्याने दुपारी ३ वाजता त्या शाळेत गेल्या होत्या. ५ वाजता त्या घरी परत आल्या तेव्हा त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. तसेच घरातील बेडरूममधील कपाटे फोडून त्यातील ५२ ग्रॅमची सोन्याची चेन तसेच २२ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, चांदीचा ग्लास व काही चांदीचे तुकडे असा चार लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे समजले.
दरम्यान, यासोबत उंदिरखेडा रस्त्यावरील वर्धमाननगरात वास्तव्याला असणारे प्रकाश पाटील (मूळ रा. खोरदड, ता.धुळे) हे पत्नीसोबत ४ रोजी घराला कुलूप लावून पाचोरा येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. सोमवारी सायंकाळी घरी परतले असता त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले. घरात पाहिले असता गोदरेज कपाट फोडून त्यातील सोन्याचे दागिने, चांदीचे तुकडे असा किमान दीड ते दोन लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र बागुल, सहा.निरीक्षक नीलेश गायकवाड हे करत आहेत.