पारोळा प्रतिनिधी । आपल्याला विरोधक नव्हे तर स्वकीयच अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असले तरी आपण आता हा अन्याय सहन करणार नसल्याचा इशारा आमदार चिमणराव पाटील यांनी दिला. ते बाजार समितीती आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.
शिवसेनेच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्त येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आमदार चिमणराव पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून आपल्या मनातली अस्वस्थता व्यक्त केली. ते म्हणाले की, गेल्या २५ वर्षांपासून मी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवून सेनेचे काम करत आहे. या काळात पक्ष विरोधात एक ही चूक केलेली नाही. पक्षात ज्येष्ठ आहे तरी माझा छळ करून तोंड दाबून बुक्क्यांचा मार देण्याचा तसेच खच्चीकरण करण्याचे स्व:पक्षातून कृत्य केले जात आहे. याबाबत मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या प्रकाराची माहिती दिली आहे, असे ते म्हणाले. त्यांना देखील जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारची माहिती मिळाली आहे. मला बोलण्याच्या मर्यादा आहेत. परंतु, काहीही सहन करण्यासाठी मी जन्मलेलो नाही, असेही ते यावेळी म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून आ. चिमणराव पाटील हे अस्वस्थ असल्याची चर्चा सुरू असतांना त्यांनी केलेली टीका ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.
या वेळी बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, उपसभापती दगडू पाटील, शेतकी संघाचे माजी अध्यक्ष चतुर पाटील, दयाराम पाटील, जितेंद्र पाटील, अरुण पाटील, सखाराम चौधरी, डॉ. दिनकर पाटील, मधुकर पाटील, बी. एन. पाटील, प्रेमानंद पाटील, डॉ. पी. के. पाटील, सरपंच गणेश पाटील उपस्थित होते.