पारोळा प्रतिनिधी । पारोळा येथील गटविकास अधिकारी शुभम गुप्ता यांच्या विरोधात तालुक्यातील ग्रामसेवकांनी तक्रार केली आहे.
पंधराव्या वित्त आयोगातून जि.प. शाळांना ऑनलाइन शिक्षणासाठी इंटरनेट वापरासाठी राउटर खरेदी करण्याची सक्ती पारोळा गटविकास अधिकारी शुभम गुप्ता यांच्याकडून केली जात आहे. या निधीतून राउटर खरेदी करणे नियमबाह्य असताना असे काम करण्यास तालुक्यातील ग्रामसेवकांना भाग पाडले जात असल्याचा आरोप ग्रामसेवकांनी केला आहे. याविरोधात पारोळा तालुका व जिल्हा ग्रामसेवक संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.
पारोळा तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींना १५ वित्त आयोगाचा निधी प्राप्त झाला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीकडून शाळांना राउटर खरेदीसाठी बिलापोटी ३१ हजार ८०० रुपये देण्याची सक्ती बीडीओंकडून केली जात आहे. हे राउटर त्यांनी स्वत: एका पुरवठादाराकडून खरेदी करून पंचायत समितीत ठेवले आहे. राउटरची बिले देऊन त्या पुरवठादारास बिल अदा करण्याची सक्ती व दमदाटी करून कारवाईची भीती दाखवून नियमबाह्य काम करण्यास भाग पाडले जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. १५व्या वित्त आयोगातील मार्गदर्शक सूचनानुसार ठरलेल्या कामांसाठीच हा खर्च करावा लागतो. यात बदल केल्यास ग्रामसभेची मंजुरी, तालुकास्तरीय समितीसह सीईओ यांची मंजुरी आवश्यक असते, ग्रामसेवकांचे म्हणणे आहे. ही सक्ती न थांबवल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.