बहिणीशी प्रेमाच्या संशयातून भर दिवसा तरूणावर ब्लेडने वार

पारोळा प्रतिनिधी । बहिणीसोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून तिच्या भावाने एका तरुणावर भर चौकात ब्लेडने वार केल्याची घटना शहरात घडली.

याबाबत वृत्त असे की, नितीन यादव पाटील हा शुक्रवारी दुपारी दुचाकीने (एमएच.१९-बी.६६०५) शेतातून घरी येत होता. गणेश इलेक्ट्रिकल्सच्या पुढे शिरोडे प्रोव्हिजनसमोर अजय रवींद्र चौधरी (रा.जुलामपुरा, दल परिसर) याने नितीनच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून अजयने नितीनवर हा हल्ला केला. त्यात रक्तबंबाळ होऊन नितीन खाली पडला.

ब्लेडने वार केल्यानंतर अजय चौधरी याने घटनास्थळावरून पळ काढला. तर तलाव गल्लीतील युवकांनी गंभीर जखमी नितीनला तातडीने पारोळा कुटीर रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार करून त्याला धुळे येथे हलवण्यात आले. पोलिसांनी अजय चौधरी यास तो राहत असलेल्या जुलामपुरा परिसरातून ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून अजय चौधरीविरूद्ध भादंवी कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content