पारोळा प्रतिनिधी | येथील नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध ४६ विकासकामांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष करण पवार होते.
येथील नगरपालिकेची सर्वसाधारण बैठक नगराध्यक्ष करण पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी पार पडली. या वेळी पालिकेतर्फे रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य देण्यात आले. या वेळी अभिजित मुंदाणकार यांनी विषयांचे वाचन केले. शहर विकास आघाडीकडून काही विषयांना हरकती असल्याचे पत्र या वेळी देण्यात आले. तर भाजपच्या अलका धीरज महाजन यांनीही एका विषयवार हरकत घेतली. या नंतर एकूण ४६ विषय अवघ्या १५ मिनिटात बहुमताने मंजूर करण्यात आले. या वेळी नगराध्यक्ष करण पवार म्हणाले की, राज्य शासनाकडून शहरी भागासाठी रोजगार हमी योजने अंतर्गत कामे सुरू करणारी पारोळा पहिली क वर्ग पालिका राहणार आहे. यात शोषखड्डे, विहिरींची साफसफाई, वृक्षारोपण, खडीकरण, शेत रस्ते, रोपे लावणे आदी ४० प्रकारच्या कामांचा कृती आराखडा तयार करुन प्राधान्य देऊन ही कामे केली जातील, असे ही या वेळी नगराध्यक्ष करण पवार यांनी याप्रसंगी नमूद केले.
या वेळी नगरसेविका सुनीता प्रकाश वाणी यांनी धरणात मुबलक साठा असल्याने शहरात किमान ४ दिवसाआड पाणीपुरवठा करावा, अशी बैठकीत मागणी केली. तर अलका महाजन यांनी एका विषयावर विरोध असल्याचे सांगून तसे पत्र दिले.
या बैठकीला नगराध्यक्ष करण पवार, उप नगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, भाजपचे गटनेते बापू महाजन, नगरसेवक पी. जी. पाटील, कैलास चौधरी, नवल सोनवणे, अंजली पवार, मनीष पाटील, वर्षा पाटील, अलका महाजन, जयश्री बडगुजर, रेखा चौधरी, सुनीता वाणी, प्रकाश महाजन, अशोक चौधरी, वैशाली पाटील व मुख्याधिकारी ज्योती भगत उपस्थित होते.