पारोळा प्रतिनिधी | तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणास बसलेल्या दाम्पत्यासह पाच जणांनी तहसीलदारांना धक्काबुक्की केल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पारोळा येथील तहसीलदार अनिल गवांदे यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यावरून पाच जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, पारोळा येथील तहसील कार्यालयाच्या समोर २५ ऑक्टोबरपासून नितीन वना पाटील व त्यांच्या पत्नी रंजना पाटील हे तहसीलच्या प्रवेशद्वाराजवळ उपोषणास बसले आहेत. त्यांचा बाजार समिती संकुलात क्रमांक ३ हा गाळा आहे. त्यापुढील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ते उपोषण करत होते. याबाबत बाजार समितीने सहायक निबंधकांना पत्र देऊन अतिक्रमण काढले गेले होते. त्यानंतरही पाटील दांपत्याचे उपोषण सुरू आहे.
दरम्यान, नितीन पाटील आणि त्यांच्या पत्नीने ९ नोव्हेंबरला दांपत्याने, शासकीय वाहनासमोर येत वाहनाची चाबी काढून घेत, चिरडण्याचा खोटा आव आणला. त्यानंतर १२ रोजी पाटील दांपत्यासह पाचोरा येथील त्यांचे नातेवाईक रवींद्र शांताराम पाटील, मनोज शांताराम पाटील व संदीप शालिक पाटील यांनी तहसीलदारांच्या दालनात प्रवेश केला. तसेच आम्हाला लेखी द्या अशी मागणी करत संबंधितांनी तहसीलदारांना धक्काबुक्की, शिवीगाळ केली. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी पारोळा गाठून पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांच्याकडून माहिती घेतली. या अनुषंगाने पाटील दाम्पत्यासह इतर पाच जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे आंदोलनकर्ते नितीन पाटील यांनी तहसीलदारांनी केलेले आरोप निराधार असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, आम्ही मागील १९ दिवसांपासून कुटुंबासह उपोषणास बसलो होतो. आम्हाला न्याय न देता, व्यवस्थित वागणूकही देत नाही. तहसीलदारांना शिवीगाळ व धक्काबुक्की केलेली नाही. तहसीलदारांनी खोटी फिर्याद दिल्याचा त्यांनी दावा केला आहे.