मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पालकांनी मुलीला पावसात खेळू नकोस म्हणून सांगितले. याचा मुलीला राग आला. त्यानंतर तिने जे केले त्यामुळे तिच्या पालकांचे टेन्शन मात्र वाढले. ही मुलगी तेरा वर्षाची आहे. अनेक जण पर्यटनासाठीही बाहेर पडत आहेत. तर लहान मुले पावसात भिजण्याचा आनंदही घेत आहे. पण पावसाचा जोर वाढतच जात असल्याने पालक मुलांना पावसात जाण्यापासून अटकाव करत आहेत. अशीच एक घटना पनवेलच्या पेंढारमध्ये घडली आहे.
पनवेलच्या पेंढारमध्ये 19 जूनला जोरात पाऊस होत आहे. संध्याकाळचे साडेचार वाजले होते. त्यावेळी एक 13 वर्षाची मुलगी पावसात खेळत होती. पाऊस जोरात असल्याने तिच्या पालकांनी तिला घरात येण्यास सांगितले. पावसाच्या पाण्यात खेळू नकोस असे तिचे पालक सांगत होते. पावसात खेळलीस तर तू आजारी पडशील असेही ते सांगत होते. त्याचा तिला भयंकर राग आला. शेवटी तिने नको तेच केले. घरच्यांचे लक्ष चुकवून तिने तिथून पळ काढला.
मुलगी घरात नाही हे पालकांच्या लक्षात आले. त्यांनी तिची शोधाशोध सुरू केली. पण शोधल्यानंतरही तिचा पत्ता लागला नाही. पालक यामुळे घाबरून गेले. त्यांनी तातडीने तळोजा पोलिस स्टेशन गाठले. तिथे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अविनाश काळदाते यांची भेट घेवून तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर तळोजा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. शिवाय मुलीचा शोधही सुरू केला आहे. मात्र तिचा अजूनही पत्ता लागू शकलेला नाही.