आई वडील हेच खरे दैवत – अविनाश भारती

avinash bharti

चाळीसगाव, प्रतिनिधी | पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी पंढरीच्या वारीला आपण जातो पण पंढरीमध्ये कटेवरी हात ठेवून उभा असणारा विठुराया कोणासाठी उभा आहे तर तो आई वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकासाठी उभा आहे. जो आई-वडिलांची सेवा करतो, त्यांच्याजवळ कायमच विठ्ठल उभा राहतो. तरुणाईने मोबाईल, व्हाट्सअप, फेसबुकच्या युगामध्ये जरूर वावरावे, पण ज्यांचे बोट धरून आपण चालायला शिकलो व ज्यांच्या खांद्यावर बसून आपण जग पहायला शिकलो अशा आई-वडिलांचा आदर करणे, सन्मान करणे व चेहऱ्यावर हसू, डोळ्यांमध्ये अभिमान निर्माण होईल, असे कार्य करणे हीच खरी ईश्वर सेवा असे प्रतिपादन मंगेश चव्हाण मित्र परिवार आयोजित एकदंत महोत्सवात सिताराम पहिला मळा येथे व्याख्याते अविनाश भारती यांनी केले.

 

मंगेश चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने यावर्षी एकदंत महोत्सवाच्या माध्यमातून २ ते १२ तारखेपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन केले गेले आहे. कार्यक्रमाची सुरुवात गणरायाच्या आरतीने होऊन जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. मंगेश चव्हाण यांनी प्रास्ताविकसांगितले की, ” माझ्या आई-वडिलांनी केलेली कष्ट मी कधीही विसरु शकणार नाही, कधीही त्यांच्या कष्टाची फेड करू शकणार नाही. २३०० सर्वसामान्य लोकांना पंढरीची वारी याच भावनेने घडवली. आई-वडिलांचे स्वप्न होते पंढरीच्या वारीला सर्वसामान्य माणसे गेली पाहिजेत. व्याख्यानमालेच्या निमित्ताने आई-वडील समजून घेत असताना त्याबद्दल तरुण म्हणून आपल्या जबाबदाऱ्या काय असतील, याचे भान सर्वांना यावे यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. या सांस्कृतिक महोत्सवाला अधिकाधिक लोकांनी भेटी द्याव्या. त्यातील प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये सहभागी व्हावे. असे आवाहनही त्यांनी केले.

सिताराम पहिलवान मळा येथे सुरू असणाऱ्या या एकदंत सांस्कृतिक महोत्सवात प्रभाकर सिंग यांचे लोखंड व पितळेच्या माध्यमातून बनवलेले अप्रतिम शिल्पांच्या प्रदर्शन सुरू असून त्यासोबतच शस्त्र प्रदर्शन व गड किल्ले प्रदर्शनही सुरू आहे. याचाही लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शालिग्राम निकम यांनी केले तर आभार भावेश कोठावदे यांनी मानले.

Protected Content