यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना बनसोडे यांच्या सोबत पारधी व त्यांच्या पोटजमातींच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाने बैठक घेतली. या बैठकीत बीड जिल्ह्यातील सतिश भोसले उर्फ खोक्या यांचे घर प्रशासनाने बुलडोझरद्वारे पाडल्याच्या घटनेवर चर्चा झाली. त्यांच्या कुटुंबाला त्वरित घरकुल आणि अन्य मूलभूत सुविधा मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
संघटनेने पारधी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र घरकुल योजना, सुशिक्षित बेरोजगारांना चारचाकी वाहन सुविधा, स्वाभिमानी सबलीकरण योजनेद्वारे जमीन वाटप, शेतकऱ्यांसाठी कृषी उपकरणे, युवकांना स्वयंरोजगार, शिक्षणासाठी मानधन, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण, सामूहिक विवाह सोहळे, समाजमंदिर उभारणी यांसारख्या विविध मागण्यांचे निवेदन आयुक्तांना सादर केले. या बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके यांच्या नेतृत्वाखाली विविध पदाधिकारी आणि राज्यभरातील २८ जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. आयुक्तांनी यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.