मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीत भाजपमधील काही मातब्बर नेत्यांचे तिकिट कापण्याचा निर्णय केंद्रीय नव्हे तर राज्यातूनच घेण्यात आल्याचा गौप्यस्फोट करून पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांवर शरसंधान केले आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकनाथराव खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश महेता यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांना तिकिटे नाकारली. यानंतर खडसेंच्या कन्या रोहिणी आणि पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. यातच आज गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीला त्या काय भूमिका स्पष्ट करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमिवर, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी काही वरिष्ठ नेत्याचीं तिकिटे कापण्याचा निर्णय हा दिल्लीतून नव्हे तर मुंबईतून घेण्यात आला होता असा गौप्यस्फोट केला. अर्थात, देवेंद्र फडणवीस यांच्या इशार्यावरूनच ही तिकिटे कापण्यात आल्याचे पंकजांनी सूचकपणे सांगितले आहे. या पार्श्वभूमिवर, त्या आज नेमक्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.