शेतकर्‍यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : खा. रक्षाताई खडसेंचे निर्देश

 

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शनिवारी सायंकाळी आलेल्या वादळामुळे केळीसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने पंचनाने करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे निर्देश खासदार रक्षाताई खडसे यांनी दिले आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर आदी तालुक्यांमध्ये काल सायंकाळी जोरदार वादळाचा फटका बसला. यात प्रामुख्याने विविध गावांच्या शिवारांमधील केळी तसेच अन्य पीक जमीनदोस्त झाले आहे. या वादळात हजारो हेक्टर जमीनीवरील केळीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

यंदा केळी उत्पादकांच्या समोर अनेक अडचणी आल्या आहेत. आधीच केळी पीक विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांना नडवण्याची भूमिका घेतली. यानंतर अलीकडच्या काळात केळीचे भाव कोसळल्यामुळे उत्पादक अक्षरश: निराश झाले आहेत. यातच आता वादळी वार्‍यांमुळे केळीची हानी झाली आहे.

या पार्श्‍वभूमिवर, आज खासदार रक्षाताई खडसे यांनी महसूल व कृषी खात्याला निर्देश देत तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकर्‍यांना तातडीने दिलासा द्यावा असे त्यांनी प्रशासनाला सांगितले आहे.

Protected Content