जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाच्या सांगता कार्यक्रमाची आजपासून जिल्ह्यात ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमात पंच प्रण प्रतिज्ञा घेऊन सुरूवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उप जिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हातात माती घेऊन पंच प्रण प्रतिज्ञा घेतली.
यावेळी जळगाव उपविभागीय अधिकारी महेश सुधलकर, तहसीलदार पंकज लोखंडे, जितेंद्र कुंवर, विजय बनसोडे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मी अशी शपथ घेतली आहे की, भारताला विकसित देश बनवायचे आहे तसेच २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. देशाच्या समृध्द वारसाचा अभिमान बाळगायचा आहे. एकता आणि एकजुटता यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे. नागरिकाचे कर्तव्य बजावयाचे आहे, तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवायचा आहे. अशी पंच प्रण प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर सेल्फी व फोटो काढून https://merimaatimeradesh.gov.in/ प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यात आले.