जळगाव प्रतिनिधी । बोलो साईबाबा की जय, ओम साईराम, बोलो बजरंग बली की जय, जय हनुमान अशा जयघोषात भाविकांनी रविवारी पाळधी येथील साईबाबा मंदिरात साईबाबा, परमभक्त हनुमान आणि गायल माताजी यांचा महाभिषेक केला. यावेळी पंचक्रोशीतील आणि जिल्ह्यातील हजारो भाविकांनी यावेळी उपस्थिती देत दर्शनाचा लाभ घेतला.
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे दरवर्षी प्रमाणे आयोजित “ब्रह्मोत्सव” यावर्षी २७ ते २९ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या धार्मिक उत्सवात जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. येथे प्राचीन सद्गुरू साईबाबा, परमभक्त हनुमान आणि स्वयंभू गायल माताजी मंदिर असून त्याचा यंदा १७ वा वर्धापनदिन समारोह साजरा करण्यात आला. महोत्सवात सकाळी पंडित गयाप्रसाद चतुर्वेदी, नाशिक यांनी मंदिरात मंत्रोच्चारात महाआरती व पूजा केल्यानंतर महाभिषेक केला.
यावेळी देवकीनंदन-रुद्राबाई, सुनील -आशा, सूरज-सुरभी या झंवर परिवाराने आणि ममता-मनीष राठी या दाम्पत्याने मोठ्या भक्तिभावाने महाभिषेक केला. ब्रह्मोत्सवात जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, खा.उन्मेष पाटील, आ.सुरेश भोळे, आ.मंगेश चव्हाण, पारोळा नगराध्यक्ष करण पवार, जि.प.सदस्य प्रताप पाटील, नगरसेवक विष्णू भंगाळे, नितीन लढा, मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, महानगरप्रमुख शरद तायडे,अनिश शहा यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी देत श्रद्धास्थान साईबाबा, रामभक्त हनुमान आणि गायल मातेचे दर्शन घेतले.
संध्याकाळी भाविकांनी हजारोंच्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेत घेतला. तीन दिवस महोत्सवात दीपक ठक्कर, अनिल कासट, राजेश दोशी, शैलेश काबरा, कैलास सोमाणी, मनीष झंवर, शरद कासट, राजेश तोतला, प्रवीण झंवर, मधुकर झंवर, रामचंद्र झंवर, किरण झंवर, चंद्रकांत इंदानी, राजेंद्र इंदाणी, हितेंद्र चौधरी, विपुल सुरतवाला, कैलास मालू, नरेश दोशी आदींनी परिश्रम घेत आयोजन यशस्वी केले.
धार्मिक क्षेत्रात महत्वाची नोंद – सूरज झंवर (आयोजक)
पाळधीच्या ब्रह्मोत्सवाची जिल्ह्यातीलच नव्हे तर खान्देशातील धार्मिक क्षेत्रात महत्वाची नोंद झाली आहे. मूळचे उत्तर प्रदेशातील पंडित प्रेमप्रकाश दुबे आणि मध्य प्रदेशातील रहिवासी मुकेश पंचोली यांच्या सुंदरकांड आणि भजन संध्येमुळे पाळधीसह पंचक्रोशीतील वातावरण भक्तिमय व पवित्र झाले आहे. 4 हजारपेक्षा अधिक भाविकांनी ब्रह्मोत्सवाचा लाभ घेतला आहे.