जळगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे दरवर्षी प्रमाणे आयोजित “ब्रह्मोत्सव” यावर्षी २७ ते २९ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला असून या धार्मिक उत्सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
पाळधी येथे प्राचीन सद्गुरू साईबाबा, परमभक्त हनुमान आणि स्वयंभू गायल माताजी मंदिर असून त्याचा यंदा १७ वा वर्धापनदिन समारोह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त आयोजकांची तयारी पूर्ण झाली आहे. महोत्सवात तीन दिवस पंडित गयाप्रसाद चतुर्वेदी, नाशिक हे मंदिरात मंत्रोच्चारात महाआरती व पूजा करणार आहेत.
शुक्रवारी दि.२७ रोजी संध्याकाळी ६ वाजता प्रयाग गौरव रत्न सन्मानित पंडित प्रेमप्रकाश दुबे हे सुंदरकांड सादर करणार असून यात हनुमानाच्या भक्तीचे वर्णन आहे. हनुमानाची भगवान श्रीरामांप्रति असलेल्या आस्थेचे वर्णन संगीतमय सुंदरकांड द्वारा पंडित दुबे हे सादर करणार आहे. बॉलिवूडचे प्लेबॅक सिंगर आणि इंडियन आयडॉल फेम मुकेश पंचोली हे दि.28 रोजी शनिवारी संध्याकाळी 7 वाजता भजन संध्या सादर करणार आहेत. साईबाबांच्या जीवन कार्याचे वर्णन करणारे अप्रतिम आणि दुर्मीळ भजन मुकेश पंचोली सादर करतील.
विविध कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन
रविवारी २९ रोजी परमभक्त हनुमान, साईबाबा, गायल माताजी यांचा सकाळी ९ वाजता पवित्र मंत्रोच्चारात महाभिषेक करण्यात येणार असून संध्याकाळी 4 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी तीनही दिवशी मोठ्या प्रमाणात उपस्थिती देऊन भक्तिरसात न्हाऊन निघावेत, खान्देश सेन्ट्रल येथील रमेश मोटार ड्रायव्हिंग स्कुल येथून वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे, असे आवाहन देवकीनंदन झंवर, सुनील झंवर, सूरज झंवर, शरदचंद्र कासट, नितीन लढा, दीपक ठक्कर, राजेश दोशी आदी आयोजन समितीने केले आहे.