जयपूर (वृत्तसंस्था) भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राइक केल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती अद्याप थांबलेल्या नाहीत. राजस्थानमधील श्रीगंगानगर परिसरात आज आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेले पाकिस्तानचे ड्रोन विमान भारतीय लष्कराने पाडले असल्याची माहिती लष्करातील सूत्रांनी दिली आहे. श्रीगंगानगरजवळ हिंदुमलकोट सीमेवर आज, (शनिवारी) पहाटे ५.४० वाजता एक पाकिस्तानी ड्रोन विमान भारतीय हद्दीत घुसण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी सतर्क असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी ड्रोनवर गोळीबार सुरू केला. त्यामुळं ते ड्रोन पुन्हा पाकिस्तानात परतलं होतं, अशी माहिती बीएसएफ अधिकाऱ्यानं दिली होती. त्यानंतर पुन्हा एक पाकिस्तानी ड्रोन श्रीगंगानगर परिसरात आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरून भारतीय हद्दीत घुसण्याच्या प्रयत्नात दिसले असता भारतीय लष्कराने ते ड्रोन पाडले. २६ फेब्रुवारीपासून आतापर्यंत भारतीय लष्करानं पाकिस्तानचे हे तिसरे ड्रोन पाडले आहे. पाच दिवसांपूर्वीच राजस्थानमधील बिकानेर येथील नाल सेक्टरमध्ये भारताच्या हद्दीत पाकिस्तानने ड्रोन घुसवण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय हवाई दलाच्या ‘सुखोई ३० एमकेआय’ या विमानाने ते ड्रोन पाडले होते. सुखोई विमानाने हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र डागून ते पाडले होते.
राजस्थानात पाकिस्तानचे तिसरे ड्रोन भारतीय लष्कराने पाडले
6 years ago
No Comments