कराची (वृत्तसंस्था) पाकिस्तानमध्ये आज सकाळी कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला लागलेल्या भीषण आगीत ६२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर ३० हून अधिक प्रवासी गंभीररित्या भाजले आहेत. ही एक्स्प्रेस कराचीहून रावळपिंडीकडे जात होती. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पंजाब प्रांताच्या दक्षिणेकडील रहीम यार खान या ठिकाणी कराची – रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला भीषण आग लागली. गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्फोटानंतर एक्स्प्रेसचे तीन डबे जळून खाक झाले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत ६२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धावत्या एक्स्प्रेसमधून उड्या मारल्याची माहिती मिळते.