भारताच्या मुत्सद्देगिरीपुढे पाकिस्तान-चीन चारीमुंड्या चीत

5bdc1a4191f53

इस्लामाबाद/बीजिंग (वृत्तसंस्था) पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादाचा एक प्रमुख चेहरा जैश-ए-मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याला पाठिशी घालण्याचा चीन व पाकिस्तानचा वर्षोनुवर्षांचा प्रयत्न बुधवारी अखेर भारताने राजकीय मुत्सद्देगिरीच्या जोरावर उधळून लावला. ‘आमच्यासमोर आलेल्या सुधारीत पुराव्यांनी आमचे समाधान झाले आहे. युनोमधील कोणताही निर्णय निष्पक्ष असावा व पूर्वग्रहदूषित नसावा ही चीनची भूमिका होती. ठोस पुरावे व सर्व सहभागी पक्षांचे एकमत यामुळेच आम्ही आमच्या भूमिकेत बदल केला आहे’, अशा शब्दात चीनने आपली भूमिका बदलली आहे. त्यानंतर अखेर नाईलाजाने का असेना पाकिस्तानने, ‘आम्ही अझरवरील निर्बंधांची तातडीने अंमलबजावणी करू’, अशी ग्वाही जगाला दिली आहे.

 

अझरला पाठिशी घालण्यासाठी चीनने वारंवार पाकिस्तानच्या बाजूने कौल देत व्हेटोचा वापर केला होता व त्यामुळेच अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरत होता. मात्र अमेरिका, फ्रान्स व ब्रिटनच्या एकत्रित प्रयत्नांनी चीनला अखेर माघार घ्यावी लागली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी चीनचा विरोध मावळण्याचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘भारताने चीनला मसूद अझरविरोधात सबळ पुरावे दिले होते. भारतातील त्याच्या कारवायांची माहिती कागदपत्रांसह चीनला देण्यात आली होती. त्यानुसारच चीनने आपला विरोध मागे घेतला आहे.’

युनोच्या या निर्णयाची अंमलबजावणी करणे पाकिस्तानला बंधनकारक आहे. पाकिस्ताननेही त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची ग्वाही लागलीच दिली आहे. ‘युनोच्या निर्णयाचे आम्ही पालन करू, तीन बाजूंनी त्याची अंमलबजावणी होईल, आम्ही अझरची मालमत्ता गोठवू, त्याच्या हालचालींवर प्रतिबंध घालू, त्याच्याकडील शस्त्रे जप्त करू, अशी आश्वासने देत आपण एक जबाबदार राष्ट्र असल्याचा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी केला आहे.

गोखले यांची कामगिरी- ‘युनो’मध्ये अझरबाबत ठराव येण्यापूर्वी भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी केलेला चीनचा दौरा निर्णायक ठरला. गोखले २२ एप्रिल रोजी चीनला गेले होते, त्यांनी तिथे चीनच्या परराष्ट्रमंत्र्याची भेट घेतली होती. याच भेटीत गोखले यांनी अझरच्या भारतविरोधी कारवायांचे ठोस पुरावे दिले होते. नवे पुरावे बघितल्यानंतर व जागतिक समूदायाच्या दबावामुळे चीनने आपल्या भूमिकेत बदल केल्याचे मानले जात आहे.

Add Comment

Protected Content