नवी दिल्ली वृत्तसंस्था । पुलवामा हल्ल्याप्रकरणी हात झटकून टाकत पाकने पुन्हा एकदा उलट्या बोंबा ठोकल्या असून या हल्ल्यासाठी भारतच जबाबदार असल्याचा दावा केला आहे.
मेजर जनरल आसीफ गफूर यांनी आज पाकची भूमिका मांडतांना भारतावरच आरोप केले आहेत. ते पत्रकार परिषदेत म्हणाले की, पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरुन भारतानं आमच्यावर बेछूट आरोप केले. कोणत्याही पुराव्यांशिवाय आरोप केले गेले. त्या आरोपांची चौकशी आमच्याकडून पूर्ण करण्यात आली. त्यामुळेच आम्हाला उत्तर देण्यास उशीर झाला, असं स्पष्टीकरण पाकिस्तानी लष्करानं दिलं. पुलवामा हल्ल्यासाठी भारतच जबाबदार असल्याचा जावईशोध पाकिस्ताननं लावला. मपुलवामातील ज्या ठिकाणी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला, ते ठिकाण नियंत्रण रेषेपासून खूप दूर आहे. त्यामुळे पाकिस्तानातील एखादी व्यक्ती तिथंपर्यंत पोहोचणं शक्य नाही. त्यामुळे या हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार कसा?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
काश्मीरमध्ये जवानांचा कडक पहारा असतो. त्या भागात सर्वसामान्य जनतेपेक्षा लष्कराच्या जवानांची संख्या जास्त आहे. सत्तर वर्षांपासून भारतीय सैन्य तिथे आहे. तिथे जर पाकिस्तानी व्यक्ती पोहोचली असा भारताचा दावा असेल, तर मग सुरक्षेत काहीतरी चूक झाली असेल. पुलवामा हल्ला ज्यानं घडवला, तो तरुण काश्मीरचाच रहिवासी आहे. त्याला भारतीय सैन्यानं वाईट वागणूक दिली होती, अशा बातम्या सोशल मीडियावर आल्या आहेत. सैन्यानं दिलेल्या वर्तणुकीचा राग मनात धरुन त्यानं हा हल्ला केला असावा, गफूर यांनी केला.