नवी दिल्ली वृत्तसंस्था । पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर आज सकाळी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत सद्यस्थितीवर चर्चा करण्यात येऊन यात पाकचा मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा रद्द करण्यात आल्याची माहिती अरूण जेटली यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक सुरू झाली. याप्रसंगी गृहमंत्री राजनाथसिंग, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, अर्थमंत्री अरूण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख बिपीन रावत, सीआरपीएफचे महासंचालक भटनागर आदींसह तपास यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यात सर्वप्रथम दोन मिनिटांचे मौन पाळून शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यानंतर सुमारे सव्वा तासांपर्यंत ही बैठक चालली. या बैठकीचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. तथापि, सूत्रांच्या माहितीनुसार यात ताज्या स्थितीची आढावा घेऊन आगामी रणनिती ठरविण्यात आली. यात पाकला अद्दल शिकवण्याबाबत चर्चा करण्यात आली. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात पाकसोबत करतारपूर साहिब कॉरिडॉरबाबत सुरू असणारी चर्चा थांबविण्याच्या निर्णयावरही चर्चा झाली.
दरम्यान, ही बैठक झाल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली असून यातील सर्व बाबी येथे सांगता येणार नाही. तथापि, पाकला भारताने दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याबाबत वाणिज्य मंत्रालय प्रक्रिया सुरू करणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, पाकचा बुरखा आंतरराष्ट्रीय पातळीवर फाडण्यात येईल असेही ते म्हणाले.