जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । क्रांतीसूर्य महात्मा फुले ते प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव-२०२६ निमित्त पी. एम. श्री केंद्रीय विद्यालय, जळगाव येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेतर्फे आयोजित या स्पर्धेत एकूण ५७ स्पर्धकांनी सहभाग घेत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी विषयांवर आकर्षक चित्रे साकारली. स्पर्धकांनी आपल्या कलाकृतींमधून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत त्यांच्या विचारांना उजाळा दिला.

या कार्यक्रमाला विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. म. सु. पगारे, संयुक्त जयंती महोत्सवाचे समन्वयक प्रा. डॉ. अनिल डोंगरे तसेच पी. एम. श्री केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य सोना कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेचा निकाल जाहीर करताना प्रथम पारितोषिक कु. पाटील हितेश्री यांनी पटकावले, द्वितीय पारितोषिक कु. मराठे अर्णव सुरेश यांना मिळाले, तर तृतीय पारितोषिक कु. सोनवणे जयश्री सुंदरलाल यांनी मिळवले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. प्रदीप लक्ष्मण गोफणे आणि कु. प्रीती अशोक सोजवळ यांनी काम पाहिले, तर संपूर्ण स्पर्धेचे समन्वयन प्रा. मोईन शेख यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासोबतच समाजसुधारकांच्या विचारांची जाणीवही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



