जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा येथील सुप्रसिद्ध कलाशिक्षक पंकज नागपुरे व त्यांच्या कुटुंबियांनी पू. ना. गाडगीळ अँड सन्स च्या कलादालनात आयोजित केलेल्या चित्र व अक्षरलेखन प्रदर्शनाने कलारसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. १ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन जैन उद्योग समूहाचे अशोक जैन आणि माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रदर्शनात पंकज नागपुरे यांच्यासह वसंत नागपुरे, जयश्री नागपुरे, शितल नागपुरे आणि स्नेहल नागपुरे-पवार यांनी सादर केलेली विविध कलाकृती पाहायला मिळत आहेत. यामध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ समितीने घोषित केलेल्या महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांवरील विशेष चित्रमालिका, सुंदर सुलेखन, अक्षरचित्र, निसर्गचित्र, गोंड आर्ट, अमूर्त चित्र, कॅलिग्राफी आणि ड्रॉइंग पेंटिंग यांचा समावेश आहे.

प्रदर्शनात सादर केलेल्या चित्रांमधून होणाऱ्या विक्रीतून मिळणाऱ्या रकमेतील ३० टक्के रक्कम ‘दीपस्तंभ मनोबल केंद्र’ मधील विशेष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहाय्यासाठी देणगी म्हणून दिली जाणार आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. या सामाजिक भावनेने प्रेरित उपक्रमामुळे नागपुरे परिवाराचे कार्य अधिकच उल्लेखनीय ठरत आहे.
हे प्रदर्शन १ ते १५ ऑक्टोबर २०२५ दरम्यान दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले असून, कलारसिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागपुरे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.



