पहूर, ता. जामनेर-रवींद्र लाठे | भावाने केलेला व्हिडीओ कॉल बहिणीच्या जीवनातील अखेरचा संवाद ठरल्याची हृदयद्रावक घटना आज दुपारी पहूर येथे घडली असून यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पहूर पेठ येथील रहिवासी असलेल्या अंजली विजय भामेरे यांना जळगाव येथील रवी वडनेरे या भावाचा व्हिडिओ कॉल आला. भावाशी व्हिडिओकॉल वरून संवाद साधत असताना अंजली घरही झाडत होत्या. दरम्यान, संवाद सुरू असतानाच त्या हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने जमिनीवर कोसळल्या. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली . पलीकडून फोनवर बोलणारा भाऊ रवी यामुळे गोंधळून गेला. तर घरात असलेला त्यांचा मुलगा चिमुकल्या हर्षलने आई खाली पडल्याने किंकाळी ठोकली. शेजारील बाळू भामेरे यांनी तातडीने डॉक्टरांना बोलावले असता अंजली यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
चटका लावणारी ‘एक्झिट’
अंजली यांच्या पतीचा दीड वर्षांपूर्वी मोठा अपघात झाल्याने त्यांना अपंगत्व आले आहे. त्यांच्या प्रणव या मोठ्या मुलाने १२ वी विज्ञान शाखेची परीक्षा दिली आहे . चिमुकला हर्षल पहूर येथील डॉ . हेडगेवार प्राथमिक विद्यालयात इयत्ता पहिलीत शिकत आहे. यातच त्यांचा अकाली मृत्यू झाल्याने भामेरे कुटुंबावर मोठी आपत्ती कोसळली आहे. ८० च्या घरातील
वयोवृद्ध आजोबा आणि अपंगत्वाशी संघर्ष करणारे वडील हेच या कुटुंबातील दोन्ही मुलांचे आधार बनले आहेत . एकूलती एक बहीण अंजूची अकाली ’एक्झिट ’ मात्र सार्यांनाच चटका लावून गेली . उद्या शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.