पेपरचे फोटो काढणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल


मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी मुंबईत इंग्रजी विषयाच्या परीक्षेदरम्यान एका विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढल्याची घटना समोर आली आहे. परीक्षा सुरु झाल्यावर विद्यार्थ्याने हे फोटो काढले असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन असल्याने त्याला अटक करण्यात आलेली नसून त्याचा मोबाईल मात्र जप्त करण्यात आला आहे.

सांताक्रूझमधील कनिष्ठ महाविद्यालय बारावीचे परीक्षा केंद्र असून वाकोला येथील रात्र महाविद्यालयातील विद्यार्थी या परीक्षा केंद्रात आला होता. गुरुवारी पहिलाच पेपर इंग्रजीचा होता. सकाळी ११.०० वाजता परीक्षा सुरु झाली. ११.३०च्या सुमारास पर्यवेक्षकाला एक विद्यार्थी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेचे मोबाईलवर फोटो काढत असल्याचे लक्षात आले आणि हा प्रकार उघड झाला. हे फोटो तो कोणाला पाठवणार होता? हे समजू शकलेले नाही. विद्यार्थ्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असून मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. त्याचा हेतू काय होता, हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. विद्यार्थी परीक्षा केंद्रात मोबाईल घेऊन कसा आला? याचाही तपास केला जाणार आहे. नियमानुसार बारावी आणि दहावीच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मोबाईल, टॅब घेऊन जाण्यास बंदी असते.

Add Comment

Protected Content