पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे आयोजीत करण्यात आलेल्या शिवपुराण कथेला भाविकांच्या उदंड उत्साहात प्रारंभ झाला आहे.
पाचोरा येथे येथे ३० एप्रिल ते ६ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या शिव महापुराण कथा व महा रुद्राभिषेक सोहळ्याची यशस्वी सुरुवात झाली आहे. शिव महापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या शोभायात्रेस अभुतपूर्व प्रतिसाद लाभला. पहिल्याच दिवशी कथेस भाविकांची प्रचंड गर्दी झाली. पाताळेश्वर मंदिरात पंडित संजयजी शर्मा यांच्या हस्ते विधिवत पूजन करून शोभायात्रा काढण्यात आली.
या शोभायात्रेत विविध जिवंत देखावे साकारण्यात आले. कोंडवाडा गल्ली, कृष्णापुरी, जामनेर रस्ता, शिवाजी महाराज चौक, राजे संभाजी रेल्वे भुयारी मार्ग, भडगाव रोड, महाराणा प्रताप चौक मार्गे शोभायात्रा शिवप्रभू नगरीत आणून तेथे महादेव पिंड स्थापित करण्यात आली.
कृष्णापुरी भागातील पाताळेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ग्रीन एप्पल इव्हेंट प्रस्तुत व पत्रकार बांधवांच्या वतीने भडगाव रोड भागातील कैलादेवी मंदिरा मागे असलेल्या सावा यांच्या जागेत ३० एप्रिल ते ६ मे दरम्यान शिवमहापुराण कथा व महा रुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी भगवान शिवप्रभू नगरी उभारण्यात आली आहे.
एक लोटा जल, सारी समस्याओंका हल या घोषवाक्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय कथा वाचक परम पुज्य पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांचे कृपाछत्र प्राप्त शिष्य परम पुज्य पंडित संजयजी शर्मा यांच्या अमृतवाणीतून शिवपुराण कथेचे निरूपण होणार आहे. कथेसोबतच महारुद्राभिषेकाचे ही आयोजन करण्यात आले आहे.
याच्या अंतर्गत सकाळी ७:३० ते ९:३० दरम्यान महारुद्राभिषेक व सायंकाळी ५:३० ते ९:३० दरम्यान शिवपुराण कथा होणार असून कथा निरूपणानंतर नैनिताल येथील सोनुजी बक्षी व सहकार्यांचा झाकीचा उत्कृष्ट कार्यक्रम सादर होणार आहे.
या कथे दरम्यान महारुद्राभिषेका साठी वैयक्तिक व कौटुंबिक तसेच १ ते ७ दिवसाच्या अभिषेक नोंदणीस प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महारुद्राभिषेकात सहभागी होणार्यांना पंडित संजयजी शर्मा यांच्या हस्ते शिवलिंग, नंदी ,नागदेवता, त्रिशूल ,जनाधारीपात्र, जलाधारी स्टॅन्ड व दोन रुद्राक्ष भेट देण्यात येणार आहेत. सर्व थरातील व विविध जाती-धर्माचे दानशूर, गोरगरीब, मध्यमवर्गीयांकडून मदतीचे हात पुढे येत आहेत.
विविध समाजाच्या महिलांनी यात आपल्या हातून सेवा कार्य व्हावे म्हणून समाजातील महिलां पुरूषांचे सहकार्य लाभत आहे. मोहन अग्रवाल, मुन्ना अग्रवाल, गोटू पटवारी, ग्रीन पल इव्हेंटचे संदीप महाजन आदींच्या नियोजनानुसार शिव महापुराण कथेचा प्रारंभ झाला असून सकाळी महारुद्राभिषेकासाठी भाविकांची संख्या वाढत आहे. कथास्थळी महिला व पुरुषांसाठी बसण्याची, पाण्याची व प्रसाद वाटपाची स्वतंत्र व उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आल्याने भाविक आनंदले आहेत.